*अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त खास लेख …*
ⓒ डाॅ. दिलीप तिवारी
जळगाव येथील उद्योजक – विचारवंत – सामाजिक व्यक्तिमत्त्व श्रद्धेय (पद्मश्री) डाॅ. भवरलालजी आणि स्व. कांताबाई जैन यांच्या सहजीवनाचे वस्तुनिष्ठ वर्णन असलेल्या आत्मकथन *’ती आणि मी’* या पुस्तकात एकत्रित व विस्तारित जैन कुटुंबातील काही परंपरा आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग लिहिलेले आहेत. भवरलालजी आणि कांताबाई यांनी स्वतःच्या कुटुंबापलिकडे जाऊन इतर नातेसंबंधातील माणसे जोडून ठेवली, त्यांच्याप्रती जबाबदारी निभावत कर्तव्ये पार पाडली. भवरलालजी – कांताबाई यांच्या नेहमी सोबत – सानिध्यात असणारे ज्येष्ठ पुत्र अशोकभाऊंनीही कुटुंब व्यवस्थेचे संस्कार उभयतांकडून घेतले. प्रसंगी ते स्वतः आचरणात आणले.
अशोकभाऊंच्या उद्योजक – सामाजिक व्यक्तिमत्त्व – दातृत्व यासंबंधी काही प्रसंग – कृती याची चर्चा कधीकधी माध्यमातून होत असते. जळगावमधील सामाजिक कार्यात अशोकभाऊंची सक्रिय असण्याची रेषा इतरांपेक्षा खूप मोठी आहे. अशोकभाऊंच्या कौटुंबिक नैतिक मूल्ये – परंपरा पालनाचेही काही विषय फार कमी चर्चेत येतात. याचे कारण म्हणजे कुटुंबाशी संबंधित गप्पा इतरांशी फार विश्वासाने कराव्या लागतात. कधीकधी कृतीचा उद्देश आणि गप्पांचा हेतू यात विरोधाभास होऊ शकतो. जैन कुटुंबात आज अशोकभाऊ सर्वांत ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना आणि सौ. ज्योती भाभीजींना नेहमी सजग – सतर्क भूमिका निभवावी लागते. अशावेळी कुटुंबातील परंपरा बदलाचे धाडसी पाऊल दोघांना परस्पर समन्वयाने उचलावे लागते.
अलीकडे माझी अशोकभाऊंशी धावती भेट झाली. आमच्या कौटुंबिक विषयावर गप्पा झाल्या. यात नव्या पिढीतील सुना हा विषय होता. वाकोद – जळगाव येथे स्थायिक झालेल्या जैन कुटुंबांच्या चौथ्या पिढीतील सुना – नातवंडे यांच्याशी संबंधित विषय होते. मी माझ्या सूनबाई विषयी बोललो. तेव्हा चर्चेच्या ओघात अशोकभाऊंनी एकत्र कुटुंबातील जेठ (पतीचे थोरले बंधू) असलेल्या पुरुषांनी परंपरांमध्ये कसा बदल करायला हवा याचा एक किस्सा सांगितला. अशोकभाऊंचा हा निर्णय आजच्या काळात एकत्रित कुटुंबात महिलांचा सन्मान करणारा आणि समान – बरोबरीची वागणूक देणारा आहे. भविष्यातील गैरसमजांचे – वादाचे विषय टाळण्यासाठी एखादी समजदार कृती समाजासाठी आदर्शवत संदेश देऊन जाते.
अशोकभाऊ म्हणाले, ‘आमच्या कुटुंबात आई स्व. कांताई असताना आणि श्रद्धेय मोठे असताना सुनांना फारसे नियम व अटी नव्हत्या. आम्ही चौघे भाऊ उद्योग विस्तारात गुंतलेलो असताना सुनांसाठी उद्योगाच्या पलीकडे जाऊन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. कोणी समाज कार्यात, कोणी शिक्षण क्षेत्रात तर कोणी वैद्यकीय क्षेत्रात लक्ष घातले. घरातील गोष्टीही इतरांनी सांभाळल्या. मोठ्यांच्या समोर महिलांच्या कार्य कर्तृत्वाला आम्हीही पाठबळ आजही देत आहोत. कांताई – मोठेभाऊ असताना चारही सुना डोक्यावर पदर घेऊन कुटुंबात वावरत असत. इतर थोरामोठ्यांसमोर ही परंपरा कायम होती. मात्र दोघांच्याही पश्चात मी कुटुंबात जेठ झालो. त्यामुळे माझ्यासमोर माझ्या पत्नीला डोक्यावर पदर न घेण्याची सूट मिळाली. परंतु इतर तीन सुनांना डोक्यावर पदर घ्यावा लागत असे. आता कुटुंबात नव्या सुना येत असताना सासूच्या नव्या भूमिकेतील तीनही भावजयींना डोक्यावर पदराची परंपरा पाळण्याची गरज नाही, असे वाटले. मी सौ. ज्योतीशी या विषयावर बोललो. त्यानंतर कुटुंबात निर्णय जाहीर करून टाकला, ‘यापुढे माझ्यासमोर कोणीही डोक्यावर पदर घेऊ नये.’ तसे पालनही सुरू झाले. खरं तर हा विषय खूप छोटा आहे, पण तो कौटुंबिक मान – सन्मान – आदर्श वर्तन याच्याशी जुळलेला आहे. आजही सामान्य कुटुंबात पाय पडणे, नमस्कार घालणे, डोक्यावर पदर घेणे असे विषय विवाद – विभक्त होण्याचे कारण ठरतात. पण एका – दोघांच्या संमतीने परंपरेत बदल केला तर एकत्रित कुटुंबाचा स्नेहबंध पुढील दोन – तीन पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो…’
अशोकभाऊंच्या गप्पांमधील हा विषय म्हणूनच लिहिला आहे. अशोकभाऊंचा आदर्श निर्णय ऐकल्यानंतर मी सुद्धा तिवारी कुटुंबातील (भडगाव) जेठ म्हणून एक निर्णय घेतला, तो म्हणजे इतर भावंडांच्या पत्नी – सुना यांनी मला प्रत्येक भेटीत नमस्कार करू नये. कुटुंबातील पाच – सात सुना नेहमी नमस्कारासाठी पुढे येतात. मलाही असे करवून घेणे फारसे पटत नव्हते. आता मी निग्रहाने नमस्कार नाकारू लागलो आहे… (नमस्कार करण्याची जबाबदारी वयाने लहान आणि विवाह न झालेल्या मुलांवर टाकावी. तशा कृतीतून ते इतरांचा आदर करणे शिकतात. आमच्यात मुलींकडून नमस्कार स्वीकारला जात नाही पण सुनांना नमस्कार करावा लागतो. मी या परंपरेत बदलाचे अनुकरण करीत आहे.)
*_अशोकभाऊ यांचा आज वाढदिवस आहे, म्हणून हा खास लेख लिहून त्यांच्या कौटुंबिक आदर्श व परिवर्तनशील निर्णयाला हितचिंतक – मित्र मंडळींच्या समोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे._*
कुटुंब परंपरेत बदलाचे पाऊल … अशोकभाऊंचा आदर्श निर्णय
