जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविडचा प्रभाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असून सर्व धार्मिक सभा, परिषदा आयोजित करण्यावरदेखील बंदी आहे. त्यानुसार आदेश निर्गमित आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आज, २५ मे रोजी साजरा करण्यात येणारा ‘रमजान ईद’ हा सण आपल्या घरीच साजरा करावा. यावेळी सोशल डिस्टसिंग पाळावे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा समाजमाध्यमे अथवा दूरध्वनी-भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी केले आहे.
सर्वांनी आपल्या घरीच ‘रमजान ईद’ साजरी करा
