संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील नागरिकांना सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४२८ झाली असून, १७९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ४७ करोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी शनिवारी दि २३ मे रोजी दिवसभरात ६७३ व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले. पैकी ६२६ अहवाल निगेटिव्ह तर ४७ पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ४२८ झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दि. २३ मे रोजी सकाळी भुसावळ येथील गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या २५१ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले होते. यामध्ये २५० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, तर भुसावळ येथील एका ३० वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यानंतर जळगाव जिल्ह्यात आणखी सहा करोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये जिल्ह्यातील भुसावळ व जळगाव येथील स्वॅब घेतलेल्या २७६ संशयितापैकी २७० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेत. तर सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावच्या शिवाजीनगरातील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. सायंकाळी जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तींच्या ११४ तपासणी अहवालापैकी ८८ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह, तर सव्वीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील २१, वरणगावचे ३, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर १४ व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आलेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या निवासाची माहिती मिळाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दिवसभरात अनुक्रमे १, ६, २६ आणि १४ असे एकूण ४७ रुग्ण आढळून आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, या ४७ रुग्णांमध्ये जळगाव आणि भुसावळ येथील बाधित जास्त असून पारोळ्यातही करोनाचा शिरकाव होत पहिला रुग्ण सापडला आहे.