• Sat. Jul 5th, 2025

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

covid19 testcovid19 test

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
राज्य या शासनाच्या या आदेशानुसार ही खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. आता शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.
मुंबईमधील शासकीय व महापालिकांच्या रूग्णालयांमधील खाटा काहीप्रमाणात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध होत नसून आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णयाला मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 
या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत.  त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केला जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व  ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने काढलेला हा आदेश राज्यात ३१ ऑगस्टपर्यत लागू राहणार आहे.
रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in  या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य  आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी प्राधीकृत केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.