चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील कृषी विभागातील सारे अधिकारी एका हाकेवर मदतीला तत्पर असल्याचा अनुभव या तीन दिवसात आला. यात कृषी सचिव ते कृषी सहाय्यक यांनी मोलाची मदत शेतकऱ्यांना केली असल्याची माहिती समन्वयक एस. बी. पाटील यांनी साथीदारशी बोलताना दिली. तसेच त्यांनी यावेळी शेतकरी कृती समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानले आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना समन्वयक पाटील म्हणाले की, खान्देशात शेतकरी २५ मे नंतर बागायती कापसाची लागवड करतात. त्यासाठी ते बियाणे त्या आधी मिळावे यासाठी राज्याचे कृषी सचिव एकनाथजी डवले यांना १७ मे रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन पाठवले होते. त्यांनी तात्काळ उत्तर देत येत्या २५ मे पासून बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत तसा आदेश देखील काढला आहे.
मका खरेदी संदर्भात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी रब्बीचा पीक कापणी प्रयोग होत नसल्याने सर्व साधारण प्रतिहेक्टरी उतारा हा २७ क्विंटल दिला होता. तो देताना पावसाळीच्या २० टक्के अधिक असा दिला होता. जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व उपसंचालक अनील भोकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील आदर्श शेतकरी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासोबत चर्चा करीत त्या पत्रकात दुरुस्ती करून सुधारीत आदेश काढले आहेत.
कृषी सचिव एकनाथजी डवले असोत की जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक सारे शेतकऱ्यांसाठी एका हाकेवर मदतीला धावून येत आहेत. यासाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने व सर्व शेतकऱ्यांचे वतीने समन्वयक एस. बी. पाटील यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.