चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी येथे गुळी नदीत रविवारी दि. ३१ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन युवक वाहून गेल्याची दुर्घटना घडली.
गुळी नदीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान सोनू केशव ढिवरे (वय २२) आणि सिद्धार्थ शिवाजी साळूंखे (वय २१, दोघे रा. वर्डी) हे युवक पाण्यात सेल्फी व फोटो काढण्यासाठी उतरले होते. नदीपात्रात दगडी बंधारा बांधला असून, सेल्फी काढत असतांना त्यावरून खाली वाहणाऱ्या पाण्यात ते पडले आणि वाहून बेपत्ता झाले. घटनास्थळी अडावद आणि चोपडा पोलीस दाखल झाले असून, बेपत्ता मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेतील आणखी एक युवक विनोद कांबळे बचावला असून, त्याने ही घटना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. रात्री साडे दहा वाजेपर्यंत कोणाचाही पत्ता लागलेला नव्हता, दरम्यान शोध कार्य सुरू असल्याची माहिती अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भदाणे यांनी दिली आहे.