पणजी : गोव्याला प्रथमच पर्यटकांची भीती वाटू लागली आहे. गोव्यात तूर्त पर्यटक नकोत अशा प्रकारची भूमिका प्रथमच गोव्यातील लोक व सरकारही घेऊ लागले आहे. परिणामी गोव्याचा पर्यटन व्यवसाय जून किंवा जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. पर्यटन सुरू होणे डिसेंबरपर्यंत तरी लांबणीवर पडले आहे.
ग्रीन झोनमध्ये असला तरी, गोव्यात पर्यटक नको अशी भूमिका घेण्याची वेळ गोमंतकीयांवर आली आहे. गोव्याची अर्थव्यवस्था खनिज व्यवसाय व पर्यटन व्यवसायावर अवलंबून असली तरी, कोरोना रुग्णसंख्या वाढायला नको या भीतीपोटी गोव्या सरकारही सतर्क झाले आहे. सरकारमधील काही मंत्री पर्यटन व्यवसाय मे महिन्याच्या अखेरपासून सुरू व्हायला हवा, असा आग्रह धरत होते. पण त्यांनीदेखील आता आपला सूर बदलला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री मायकल लोबो वगैरे अगोदर प्रत्येकाचा जीव वाचवूया, मग पर्यटनाविषयी बोलूया अशी भूमिका घेऊ लागले आहेत.