• Sun. Jul 6th, 2025

चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठीची सक्ती

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सीबीएसई आयसीएसई, तसेच केंब्रीज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांवर कारवाईचा इशारा

राज्यातील सीबीएसई आयसीएसई, तसेच केंब्रीज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही मराठी शिकविणे या वर्षापासून सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी अनिवार्य करण्या-या शासन निर्णयाचे (सीबीएसई आयसीएसई, तसेच केंब्रीज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या) शाळा पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या विभागातील उपसंचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तसेच केंब्रिज व अन्य मंडळाचे अभ्यासक्रम राबवित असलेल्या शाळांना मराठी विषय अनिवार्य करणे भाग पडणार आहे.

पहिली व सहावीत अंमलबजावणी याच वर्षांपासून
राज्यातील शाळांमध्ये टप्प्या टप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.