नगराध्यक्षा सौ. मनिषाताई चौधरी यांचे आवाहन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपड्यातील वाढलेली करोना रुग्णांची संख्या पाहता नगराध्यक्ष सौ. मनिषाताई जीवन चौधरी यांनी चोपडावासीयांना घरातच राहण्याचं आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनाही त्यांनी दुकानाबाहेर सोशल डिस्टनसिंगचे पालन विविध उपाययोजना करण्याचे सांगत नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
या आवाहनात म्हटले आहे की,
देशात तसेच राज्यात करोना (कोव्हिड-१९) विषाणूमुळे होणारा साथीचा आजार गतीने पसरत आहे. आपल्या चोपडा शहरातदेखील या साथरोगाने शिरकाव केला आहे. चोपडा शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरीही शहरातील नागरिकांकडून सदर साथरोगाबाबत योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत नाही. शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी पहाता शहरवासीयांना सदर रोगाबाबतचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. अनेकवेळा नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे कामाशिवाय घराबाहेर न पडणेचे आवाहन करूनही त्याचे पालन होत नाही. याउलट शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा गर्दी होतच आहे. त्यामुळे असे काही बेजबाबदार नागरिक स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. मोठ्या प्रमाणावर शहरातील रस्त्यांवर, बाजारात लोक एकत्र येत असून, सोशल डिस्टनसिंगचेही पालन करीत नाही. अखेर, नगरपरिषद प्रशासनाने ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा विचार केला आहे, असे आवाजहनवजा निवेदन चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. मनिषाताई चौधरी यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
चोपडा शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, हातगाडीधारक यांना आवाहन करण्यात येते की, लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. परवानाधारक ओळखपत्र व पासेस असणारे फळ व भाजीपाला विक्रेते त्यांना नेमून दिलेले ठिकाणीच फळ, भाजीपाला विक्री करण्याची परवानगी राहील. त्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही परवानगी असणार नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही नगराध्यक्षा चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनचे नियम तोडणारे सर्व प्रकारचे व्यापारी व विक्रेते आणि नागरिक यांच्यावर प्रशासनातर्फे कठोर कायदेशीर कारवाई झाल्यास संबंधित व्यक्ती, व्यापारी, संस्था व्यक्तिशः जबाबदार राहतील. तरी सर्व संबंधितांनी होणारी कटू कारवाई टाळण्याबाबत योग्य ती खबरदारी घेत कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी चोपडा नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.