मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे आवाहन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील तमाम खासगी रुग्णालय (करोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) यांना सूचित करण्यात येते की, सदरची आपत्कालीन परिस्थिती पाहता शहरातील नागरिकांना आरोग्यविषयी समस्या उद्भवल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपले रुग्णालय नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केले असून, त्यात ज्या रुग्णांना रुग्णालयात बोलविण्याची आवश्यकता नसल्यास त्यांना शक्यतो दुरध्वनीद्वारे सल्ला देण्यात यावा. तथापि आपलेकडेस उपचारासाठी/तपासणीसाठी आलेले एकुण रुग्ण, संशयीत रुग्ण (सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास अशी लक्षणे एकत्रितरित्या दिसणा-या रुग्णांचा तपशिल) यांविषयी दैनंदिन माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी व करोनाचा विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखणेकामी संशयीत रुग्णाविषयीची माहिती देऊन सदरील रुग्णास तत्काळ (त्याचदिवशी) उपजिल्हा रुग्णालय, चोपडा यांचेकडेस संदर्भित करावे. तसेच नगरपरिषदेस यांविषयी माहिती वेळोवेळी सादर करणेत यावी, असे नमूद केले आहे.
… तर कारवाई करणार!
सदरील आपातकालीन परिस्थितीत आपले रुग्णालय बंद असल्यास किंवा रुग्णांना तपासणीस/उपचारास नकार दिल्यास आपणाविरुध्द अत्याश्यक सेवा कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ तसेच भारतीय दंडसहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई येईल, असा इशाराही चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली आहे.