करोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने असोसिएशनचा निर्णय
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. चोपड्यातही करोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, येथील संसर्ग साखळी तोडण्यासाठी चोपडा शहरातील भाजीपाला अडत असोसिएशनने आजपासून पुढील सात दिवस भाजीपाला मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतीच चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
शहरातील कृषी उत्पन बाजार समितीत आयोजित बैठकीत एकमताने भाजीपाला मार्केट पुढील सात दिवस म्हणजेच, आज १ ते ७ जूनपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीप्रसंगी उपस्थित मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, नरेशभाऊ महाजन, पुंडलिक महाजन, भुराभाऊ महाजन, ईश्वर चोधरी, वामन महाजन, एकनाथ महाजन, संजय पाटील, बापू पाटील, संजय माळी, संजय महाजन, मधुकर महाजन, बापू उखा पाटील, समाधान महाजन, उमेश महाजन, कैलास चोधरी, अनिल बापू, भरत चोधरी, राम चोधरी, सुदाम महाजन, चेतन चोधरी आदी उपस्थित होते. असोसिएशनला नेहमीच सहकार्य करणाऱ्या बाजार समितीचे नारायण पाटील, नंदकिशोर पाटील व संचालक मंडळ तसेच व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतभाई सचदेव, अनिलभाऊ वानखेडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस. बी. नाना पाटील यांचे यावेळी आभार मानण्यात आले.
‘चोपडेकरांनो, घराबाहेर पडू नका’ चोपडेकरांनी करोनाशी लढण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत सहकार्य करावे, असे आवाहनही श्री संत सावतामाळी भाजीपाला अडत असोसिएशन, चोपडा यांच्यातर्फे करण्यात आले.