जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा येथील चार रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण २९ करोना पॉझिटिव्ह आढळले.
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील १९६ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल शुक्रवारी दि. २९ मे रोजी दुपारी प्राप्त झाले. यापैकी १७२ अहवाल निगेटिव्ह आले, तर २४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात आलेल्या अहवालात पाच करोना पॉझिटिव्ह आले, त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ६०० वर पोहोचली आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल ७७ करोना रुग्ण आढळल्याने बधितांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले.
जळगाव जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जळगाव जिल्हावासीयांना खबरदारी घ्यावी लागेल. प्रशासनाकडूनही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील रुग्णांचा मृत्युदर हा देशातील मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे, त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढला आहे. एकट्या जळगाव शहरात तब्बल १४८ करोनाबाधित झाले असून, ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह
सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाच करोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटेनगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहाशे झाली आहे.
धुळ्यात १३२, तर नंदुरबारमध्ये ३२ रुग्ण धुळे आणि नंदुरबारमध्येही करोनाबाधित वाढत असून, धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २९ मे रोजी सायंकाळपर्यंत १३२ होती. जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या ३२ झाली असून, ३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १० रुग्ण उपचार घेत आहेत.