जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा जळगाव,अमळनेर, भडगाव, पाचोरा, जामनेर आणि धरणगाव येथील करोना संशयित व्यक्तींचे ४९ अहवाल प्राप्त झाले. या प्राप्त अहवालातून ४४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह, तर पाच जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये पाचपैकी जळगावचे २, तर अमळनेर, भडगाव आणि धरणगावमधील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह आढळला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर १३३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
धुळ्यात दोन वाढले; ८१ रुग्ण
दरम्यान, बुधवारी दिवसभरात धुळ्यात दोन तर नंदुरबारमध्ये एक करोना संशयित पॉझिटिव्ह आढळला आहे. धुळ्यातील एका रिक्षाचालकास दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, करोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. तो अहवाल बुधवारी प्राप्त झाला असता तो पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर प्रशासनाने रिक्षाचालक राहत असलेल्या परिसराला सील करीत त्याच्या कुटुंबियांना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. शिरपूर शहरातील एका एसटी बसचालकाला करोनाची लागण झाल्याचे बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. हा बसचालक गेल्या आठवड्यात परराज्यातील लोकांना बसने सोडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात गेला होता. तेथून आल्यावर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास झाला असता तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता धुळे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ७९ वरून ८१ गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून, ४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
नंदुरबारमध्ये एक सापडला
नंदुरबारमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी उर्वरित करोना रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकही करोनाबाधित उपचारासाठी दाखल नव्हता. मात्र , दोनच दिवसांत नंदुरबारमध्ये एक संशयिताचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. हा रुग्ण त्याच्या मुलीकडे मुंबईहुन परतल्याचे समजते. नंदुरबार जिल्ह्यात एकूण २२ रुग्ण असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १९ करोनामुक्त झाले आहेत.