गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच ऑल इंडिया जैन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी हुंडिया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जैन समाजाच्या साध्वी आणि गुरुंबाबत निवेदन दिले. यामध्ये लॉकडाउनच्या परिस्थितीत जैन समाजातील गुरूंच्या राहण्याची तसेच पाणी आणि भोजनाची व्यवस्थेबाबत यात उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत सरकार पूर्ण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
आज संपूर्ण जग करोनाने ग्रस्त आहे. भारतातही करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा सरळ फटका भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राला बसत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. करोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरुपाचे रूप धारण करीत आहे. या गंभीर परिस्थितीत प्रत्येकजण एका बाजूला आपल्या घरात बंद असून, जैन समाजातील असंख्य गुरुंनी धर्मासाठी जगाची भौतिकता सोडून दिली आहे. यामुळे या लॉकडाउनमध्ये त्यांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये करोनाने कहर माजवला असून, अशा परिस्थितीत ऋषी महात्मांच्या आरोग्याबद्दल जागरूकता ठेवणे आपले कर्तव्य आहे. याचबरोबर जैन भिक्षू साध्वीजींसाठी आवश्यक असल्यास अन्न व पाण्याची व्यवस्था राज्य सरकार करेल, अशी ग्वाहीही गृहमंत्री देशमुख यांनी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात भेट देत परिस्थितीचा स्वत: आढावा घेत आहेत.
या चर्चेबाबत अधिक माहिती देताना ‘आयजेए’चे अध्यक्ष हार्दिक हुंडिया म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या आश्वासनाबद्दल मी संपूर्ण जैन समाजाकडून त्यांचे आभार मानतो. या गंभीर परिस्थितीतसुद्धा, गृहमंत्री अनिल देशमुख हे मानवतेचे आणि धर्माबद्दल उदार भावना बाळगणारे खरे प्रजापलक असल्याचे हुंडिया म्हणाले. जैन भिक्षू साध्वीजी महाराजांच्या हितासाठी प्रत्येक संघटनेने व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले.