जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी येत असल्याने दगावत आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरीकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास विशेषत: ताप असल्यास व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने नजिकच्या डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जिल्हावासियांना केले आहे.
जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, जिल्ह्याच्या काही भागात करोनाबाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत नागरीक सहभागी होत असल्याने संसर्ग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून यापुढे दुर्दैवाने करोनाबाधित रुग्णाचा मृत्यु जेथे होईल त्याचठिकाणी अग्निसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर वेळेत चांगले उपचार व्हावेत याकरीता सर्व सुविधायुक्त खासगी रुग्णालये, तसेच रेल्वेचे रुग्णालयही अधिग्रहीत करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता कोविड रुगणालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य, युनानी, होमिओपथी डॉक्टर यांचेकडे येणाऱ्या रुग्णांना करोना सदृश्य लक्षणे आढळल्यास रुग्णांस त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुगण हे अमळनेर, भुसावळ व जळगाव शहरातील आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या शहरातील नागरीकांच्या ट्रेसिंग व ट्रॅकिंगवर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकरी डॉ. ढाकणे यांनी या वेळी दिले.