नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील ६८ वर्षीय महिला व नटावद येथील ३१ वर्षीय पुरुष असे अखेरचे दोन कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. पंकज चौधरी, अधिपरिचारिका नामी गावीत, पौर्णिमा भोसले, मंजुषा मावची, टिना वळवी, कक्षसेवक उदय परदेशी, अक्रम शेख आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेले सर्व 19 रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाले आहेत. दोन रुग्णांचा यापूर्वी मृत्यु झाला आहे. सोमवारी दि. १८ मे रोजी डिस्जार्ज देण्यात आलेल्या दोघाचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे दोघांना सोमवारी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जातांना दोघा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनीदेखील सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्ण संसर्गमुक्त होणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिकांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्याबरोबर त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न केले. जनतेचे चांगले सहकार्य लाभले. पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. आपल्या राज्यातून आणि देशातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होईपर्यंत आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आजच्या आनंदाच्या प्रसंगाने करोनाविषयी नागरिकांच्या मनात असलेली भिती कमी होईल आणि ते प्रशासनाच्या नियमांचे पालन करतील असा विश्वास मला वाटतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी. शहरातील व्यवहार सुरळीत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे आणि या संकटापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व करोना योद्ध्यांविषयी सन्मानाची भावना मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.