• Sat. Jul 5th, 2025

आमदार मंगेश चव्हाण यांची गृहमंत्री – कृषिमंत्री यांच्याकडे मागणी
चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी करण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. दोन दिवसांपूर्वी बनावट खतसाठा सापडला होता. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली.
तालुक्यातील शेतकरी आधीच अवकाळी पाउस, दुष्काळ, चक्रीवादळ, शेतीमालाची न होणारी विक्री यामुळे अडचणीत आहे. अश्या परिस्थितीत नवीन खरीप हंगामात वापरण्यात येणारे खतच जर बनावट मिळणार असेल तर शेतकऱ्यांची मनस्थिती खचणार आहे. सदर बनावट खत प्रकरणात सहभागी  महावीर कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, सदर प्रकरणाची गृहमंत्री व कृषिमंत्री यांनी सीबीआय, सीआयडी किंवा उच्चस्तरीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी. यात सहभागी असणाऱ्या सर्वांचे कॉल रेकॉर्ड्स, प्रवास हिस्ट्री आदी सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी व हे मोठे रॅकेट असून त्याचा पर्दाफाश करण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारादेखील आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. ८) दुपारी शहरातील घाटरोडवरील गोडावूनमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे २५ मेट्रिक टन वजनाचे ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ५०० बॅग १८-१८-१० हे बनावट रासायनिक खत पकडले. पथकाने हा साठा तपासला असता सुमारे ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २५ मेट्रिक टन असलेल्या १८-१८-१० खताच्या ५०० बॅगा मिळून आल्या होत्या. सदर प्रकार उघडकीस येताच चाळीसगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना फोनवर सविस्तर माहिती देत यात बनावट खतांची निर्मिती व विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी हा बनावट खतांचा साठा गोडावून मध्ये पडून असण्याची शक्यता व्यक्त केली.

यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्री व कृषिमंत्री यांना पत्र देखील दिले आहे, त्यात त्यांनी अनेक बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. नाशिक, जळगाव व चाळीसगाव कृषी विभागाच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पथकाने या रासायनिक खतांची तपासणी केली असता बॅगांवर कोयना दानेदार मिश्र खते कारखाना मलकापूर (ता. कराड जि. सातारा) असा मजकूर छापलेला आहे. ट्रकच्या चालकांनी हा साठा गुजराथ राज्यातील कंपनीतून भरून आणली असल्याची माहिती दिली. खतांचे बिल तपासले असता त्यातही तफावत आढळून आली. यापूर्वीदेखील चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बनावट खत व बियाणे यांचा साठा सापडला आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.