चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील मराठे गाव येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिणी मराठा समाजातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दि.१२ मे रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.
धुळे येथील कै. ओंकारराव धुडकू चव्हाण यांची नात, श्रीराम ओंकार चव्हाण यांची कन्या असून, वर – ज्ञानेश्वर रा. राठेगाव ता. चोपडा येथील कै. गोटू पोपट देवकर यांचे नातू, तुकाराम गोटू देवकर यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. यांच्या विवाहाची तारीख १६ एप्रिल ठरविण्यात आली होती. परंतु, २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक कामे झाली होती तर अनेक कामे व्हायची बाकी होती. वधु पित्याकडून धुळे येथे हॉल बुक झाला होता. दोघा कुटुंबाकडुन बँड बुक केला होता. नवरदेव कडून धुळे येथे जाण्यासाठी गाड्या बुकिंग करण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे वधु-वराचे कपडे, आभूषणे खरेदी करायचे बाकी होते. अशा प्रकारचे अनेक कामे झाले होते. तर काही कामे बाकीही होती. त्यामुळे सदरील कुटुंबांची द्विधा मनस्थिती होती. अशा अडचणीच्या परिस्थितीत १६ एप्रिलला होणारे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे वर-वधु दोघी कुटुंबीयांनी एकमेकांशी संपर्क करून कलेक्टर ऑफिस यांच्या कडून लग्न करण्याची परवानगी घेतली. यानंतर फक्त दहा ते पंधरा लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी मिळाली. अशा पध्दतीने नुकतेच गेल्या आठवड्यात सदरील वधु-वर विवाह बंधनात अडकले व सोशल डिस्टनसिंग पाळत विवाह संपन्न झाला.
सदरील कुटुंबीयांनी लॉकडाऊन उठण्याची वेळ न बघता, लॉकडाऊन मध्येच विवाह उरकवला. यामुळे वधु पित्याचे व वर पित्याचे लाखो रुपये वाचण्यास मदत झाली आहे. त्यामुळे समाजातील ज्यांचे ज्यांचे विवाह जुळले आहेत. त्यांनी लॉकडाऊन उठण्याची वेळ न बघता साध्या पद्धतीने विवाह करून पैशांची बचत करीत समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन दक्षिणी मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.