• Sat. Jul 5th, 2025

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्त राजाराम माने यांची सूचना

नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) आगामी मान्सून काळात परिस्थितीचा अंदाज कुठल्याही प्रकारची वित्त व जीवितहानी होणार नाही, याबाबतची दक्षता नाशिक विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी घ्यावी तसेच साथरोग व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी. त्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज आयोजित मान्सून पूर्व तयारी बाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित नाशिक विभागातील पाचही जिल्हयांच्या आढावा बैठकीत श्री.माने बोलत होते. या वेळी उपायुक्त सर्वश्री दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, संगीता धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. रणजीत हांडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री माने म्हणाले, मान्सून काळात करावयाचे कोणतेही काम दुर्लक्षित होणार नाही याकडे सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी नियोजनपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक आहे. हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आप आपल्या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन कुठल्याही प्रकारची वित्त व जीवितहानी होणार नाही, यासाठी सर्व जिल्हयांनी प्रयत्न करावेत असेही यावेळी विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
विभागातील संभाव्य पूरग्रस्त गावे :
विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगांव या पाचही जिल्हयांमधून संभाव्य पूरग्रस्त गावे आहेत, त्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका व निफाड, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा व शेवगांव, धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका, शिरपूर, शिंदखेडा व साक्री, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर, अक्कलकुवा, जळगांव जिल्हयातील  जळगांव  व भुसावळ या तालुक्यांमधील गावांचा समावेश आहे. त्यानुसार संभाव्य पुरग्रस्त गावांची माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी.

जिल्हा पातळीवर करावयाचे नियोजन:
जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्यावत करण्यात यावेत. जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागाने आपतकालीन परिस्थितीत असलेल्या प्रमाणित कार्यपद्धती प्रमाणे आपली माहिती अद्ययावत करावी. प्रत्येक जिल्ह्यातील मान्सून उपाययोजना संबंधित पोलीस विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बीएसएनएल, लघु पाट बंधारे, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका येथे 24 तासांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. संभाव्य आपत्ती बाबत सुधारित आपतकालीन आराखडा तयार करण्यात यावा. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पातळीवर आवश्यक बचाव साहित्य सुस्थितीत आहे किंवा कसे, याबाबत आढावा घेण्यात यावा. त्याचप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात आवश्यक सर्व यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच इतर संपर्कमाध्यमे अद्ययावत करण्यात यावेत, अशा सूचना यावेळी सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे व जलसंपदा विभागामार्फत तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करून बिनतारी यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात यावेत. संबंधित विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील संदेश देवाण घेवाणीची साधने तसेच बिनतारी संदेश यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचनादेखील या वेळी देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिकांमार्फत पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले व गटार सफाई मोहीम हाती घेण्यात यावी, तसेच साथीचे रोग पसरू नये यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करण्यात यावी. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीचे रोग पसरू नये, यासाठी पुरेसा औषधसाठा, पुरेशा रुग्णवाहिका, आरोग्य पथके याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करावे. त्याचप्रमाणे विद्युत विभागामार्फत ट्रान्सफार्मर्स, विद्युत खांब, वायर्स, यांची दुरुस्ती करून घेणे, तसेच खोलगट भागातील ट्रान्सफॉर्मर पावसाळ्यापूर्वी शक्य असल्यास उंच ठिकाणी हलविणे, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक दक्षता टीम तयार ठेऊन विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दुरूस्ती पथकांची नेमणूक करण्यात यावी.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या होमगार्डची यादी अद्ययावत करून आपत्तीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळवणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी याबाबतचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागामार्फत दुरुस्ती पथकांची नियुक्ती करून मोटार पंप पाईप, यामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठयाची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी व जलस्रोत दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या शोध व बचाव साहित्यामधील रबरी व फायबर बोट, लाईफ बॉईज व लाईफ जॅकेट्स आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत, याबाबत खात्री करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील एनआयसीद्वारे जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर पावसाची अद्यावत माहिती भरण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी सादरीकरणाद्वारे विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानंतर जिल्हानिहाय कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत देखील आढावा घेण्यात आला.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.