• Sat. Jul 5th, 2025

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

• शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील.
• शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा.
• ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करा
• जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा.

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिकस्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमीत शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशारितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रन क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, सोमवारी (दि. १८) येथे दिले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्हिसीच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता ,शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच शिक्षण विभागाचे संचालक सहभागी झाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु शकली नाही तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोन मधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोन मध्ये सुरु शाळा करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ई-लर्र्निंग, डिजिटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांतील आराखडा तयार करण्यात यावा. दरवर्षी प्रमाणेच नियमित असे शैक्षणीक वर्ष सुरु होईल असे नियोजन करण्यात यावे. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्य सचिव मेहता यांनी कोविड-१९ चे नियमांचा पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होईल असे गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले.

राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु असल्याची माहिती श्रीमती कृष्णा यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसेच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले.

बालभारतीची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करण्यात आल्याने, ही पुस्तके ६७ लाख वेळा डाऊनलोड करण्यात आल्याची तसेच अन्य उपक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.