१) इंग्रजांनी आपल्या देशातून गेली दीडशे वर्ष कच्चामाल देऊन पक्का माल येथे जादा किमतीत विकून किती पैसे कमावले याचा हिशोब पितामह दादाभाई नवरोजी यांनी भारतीय जनतेला सांगितला आणि त्या हिशोबाची गणित काँग्रेसने लोकांपर्यंत पोहोचवून महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस.. काँग्रेस सोशलिस्ट (कम्युनिस्ट) समाजवादी आदिवासी मुस्लिम फकीर सन्यासी व देशप्रेमी जनतेने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. लाठीमार खाल्ला बलिदान केले. तुरुंगात गेले आणि देशाला स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
२) बाबासाहेब आंबेकरांनी सामाजिक समतेची लढाई केली व स्वातंत्र्यानंतर राजघटना लिहिण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली व त्यांनी लोकशाही धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य समता बंधुत्व ची पुरस्कार करणारी घटना दिली ….मनुवादी समाज व्यवस्था पुसून टाकली.
३) या लढ्यात बीजेपीचे पूर्वरूप आर एस एस व समविचारी हे कुठेच नव्हते.. त्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांना उचलत नव्हते ते ब्रिटिशांची चापलुशी ही करत त्यामुळं त्यांचेवर मिरत कट, कानपूर कट क्राकोरी, कट असे एकही खटले भरले. तुरुंगवास झाले नाहीत.
सन्मानाने ते संघ कार्य करीत राहिले आणि त्यामुळे ब्रिटिश राजवटमधील जनतेच्या शोषणाचा हिशोब विचारण्याची त्यांना गरज भासली नाही.
४) १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जो देशात विकास झाला सुईपासून रणगाडा, बॉम्ब, मिसाईलपर्यंत देशात बनू लागले. चार चाकी गाडीपासून ते विमानापर्यंत उत्पन्न उत्पादन होऊ लागले. तसेच घरगुती टेलिफोनपासून मोबाइलपर्यंत चंद्रापासून आकाशापर्यंत जी विकासाची भरारी भारताने स्वातंत्र्यानंतर मारली त्याचे श्रेय अर्थातच काँग्रेसला दिले पाहिजे. विरोधी पक्षही पुरोगामी व विकासासाठी सकारात्मक.. रचनात्मक..भूमिकेतून विरोध करत (अपवाद भारतीय जनसंघचा..पण त्यांचे काही चालत नव्हते) आता काँग्रेसने काय केले? ७० वर्षांचा हिशोब? असले अज्ञान मूलक प्रश्न विचारून भाजपवाले देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.
५) इंग्रजांआधी ७०० वर्षे मुघल होते. या देशातील मनुवादी राजवटीमुळे जनतेतील जातीय फूटमुळे मोगलांना देशात येणे सोपे झाले आणि त्यांनी सातशे वर्षे राज्य केले आणि भारताच्याच मातीत मेले. त्यात मलिकंबरसारखे राज्यकर्ते पण होते. त्यांना ही मंडळी टार्गेट करत असतात आणि भंगार विकून पोट भरणाऱ्या मजूर, गरीब, मुस्लिम यांना निशाणा करून दुहीचे राजकारण करीत असतात त्याआधी मोघलपासून पराभूत झालेले क्षत्रिय राजे व त्यांच्या आपसातील मारामाऱ्या, गद्दाऱ्या याची शहानिशा न करता त्यांचे राज्यात मनुस्मृतीनुसार काम चाले. वैश्य, शूद्र हे काबाडकष्ट करत व या वर्गाना पोसत. म्हणून ती राजेशाही म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ होता असा त्यांचा दावा आहे. तशी पद्धतशीर दिशाभूल करून तो “भारत” नरेंद्र मोदीच निर्माण करतील. हे मोदींचं व्हिजन आहे असे हाडुक बहुजन तरुणांना चाघळण्यास देऊन ते तसा प्रचार करत असतात. मध्येच अफगाणिस्तान पासून व्हिएतनामपर्यंत अखंड भारत होता, असा नकाशा दाखवतात. प्रत्यक्षात नेपाळसुद्धा ३५ राज्यात विखुरले होते. भारतात तर शेकडो संस्थानिक यांनी भारत छिन्नविछिन्न करून ठेवला होता. माणसाला माणसाचा विटाळ होत होता. शिक्षण फक्त ब्राह्मण वर्गाला. थोडेसे क्षत्रियाना मिळे आणि हे सोडून उरलेले बहुजन म्हणजे वैश्य, शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, उच्चवर्णीय महिला ९५ टक्के संपूर्ण अडाणी होते.
६) वेठबिगारी, जमीनदारी आणि मालमत्तेचा अधिकार नसलेले २५ टक्के दलित आदिवासी भटके विमुक्त आणि तथाकथित उच्चवर्णीय यांना सेवा देणारे बारा बलुतेदार, अलुतेदार जेमतेम पोट भरत. त्या जातीनी उच्चवर्णीय यांना सोडून जाऊ नये म्हणून त्या जातींना तुम्ही “क्षत्रिय” आहात असा समज करून दिला जातो. (उदा क्षत्रिय … समाज)
७) महिलांना स्वातंत्र्य नव्हते भोगवस्तू म्हणून तिला किंमत होती. या ९५ टक्केमधून सुंदर महिला ५ टक्केच्याच प्रोपर्टीसारखी असतं अशी बदमाश सरंजामशाही म्हणजेच हिंदू साम्राज्य होय अशाही भूलथापा मारतात. त्यांची खरी लढाई बहुजनांची साथ घेऊन संविधान संपवणे व मोघलकाळ पूर्वीची दलित आदिवासी आणि त्यांच्याच जातीतील गरीब आणि बारा बलुतेदार जनता यांना पूर्वीप्रमाणे खडकावर उभे करणे असे उद्दिष्टांची आहे. (याला ते आत्मत्निर्भरता म्हणतील.) त्यासाठी काँग्रेसने संविधानाचा अधिकार वापरून देशातील जनतेच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रे निर्माण केली ती खासगी व्यक्तींना विकणे आणि सरकारची एकाधिकार? शाही आम्ही खासगी व्यक्तींना देतो म्हणजे हे आत्मनिर्भरता अशी त्यांनी व्याख्या गैरलागू केली आहे तसेच कामगार वर्गाने १८७६ साली फॅक्टरी अॅक्टपासून युनियनच अधिकार किमान वेतन बोनस, पेन्शन, ग्रॅच्युईटी, ८ तासांचा दिवस. जादा कामाचा मोबदला, नोकरीची शाश्वती हे लढून मिळवलेले कायदे संपवणे उद्दिष्ट आहे. म्हणजेच महात्मा फुले यांचे शिष्य नारायण लोखंडे यांच्याकाळी कामगार कायदे नव्हते. त्यांनी कामगार चळवळीची सुरुवात केली. त्या कालपर्यंत भारताचा विकास मागे रेटने आहे. मग तेथून आपल्याला हवे ते मध्यमयूगातील हिंदू साम्राज्याचे सुवर्णयूगाचा मार्ग प्रशस्त होईल, असा आभास ते निर्माण करीत आहेत म्हणून
‘चोंभालीत माझ्या जखमांना
इथवर मी-आलो…
आणि मेल्या दुःखासाठी…
पुन्हा जागा झालो’
या चार ओळीप्रमाणे आपणास परत मागे जायचे की जागे होऊन २१ व्या शतकातील समाजवादी लोकशाहीवादी भारताकडे मार्गक्रमण करायचे याचा विचार करावा लागेल. त्यासाठी मागे न पाहता एथपर्यंत आलो पुढे तुम्ही काय करणार आहेत? हे विचारण्याची गरज भारतातील तमाम कष्टकरी, श्रमिक, बहुजन, दलित, आदिवासी महिला यांनी विचारण्याची गरज आहे.
लेखक – कॉम्रेड अमृत महाजन, चोपडा ९८६०५२०५६०
(या लेखातील मते ही लेखकाची असून, संपादकांचा त्याच्याशी संबंध नाही – मुख्य संपादक)