चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या पंधरा दिवसांमध्ये चोपडा शहरात करोनासंसर्गाने जोर पकडल्याचे चित्र आहे. बुधवारी ११, तर गुरुवारी १२ असे नवीन २३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चोपडेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि काही निष्काळजी नागरिकांमुळे ही परिस्थिती होत असून, चोपड्यातील नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडणे योग्य ठरणार आहे. आधी शहरात वाढणारा करोना आता ग्रामीण भागातही फोफावत असल्याने लोकांकडून प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे.
गुरुवारी प्राप्त झालेल्या ५६ अहवालात ४७ निगेटिव्ह तर १२ पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चोपडा शहरातील बोरोलेनगर, पंकजनगर आणि श्रीकृष्णनगर प्रत्येकी १ आणि प्रभात कॉलनीत एकाच परिवारातील ४ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच बुधवारी रात्री ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकूण २३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली. आतापर्यंत चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या १७४ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.