शहादा (साथीदार वृत्तसेवा) शहादा तालुक्यातील गणोर या गावी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अस्मिता जागर मोहीम राबविण्यात आली. जागर मोहिमेअंतर्गत महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी अस्मिता जागर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते.
ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून त्यांचा संघ निर्मिती करणे व त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करीत असते. तालुक्यातील जवळपास १८१ गावांमध्ये ग्रामीण विकास योजनेअंतर्गत महिलांचे गट निर्माण करून त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणोर येथील जागृती महिला संघ यांनी या अभियानात सहभाग नोंदवित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेत आशा विनोद पटले प्रथम क्रमांक ,चंद्रकांता हिरामण पवार द्वितीय क्रमांक तर अनिता गुमानसिंग भावरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.