• Fri. Jul 4th, 2025

‘फेसमास्क’ न वापरणा-यांवर बृहन्मुंबई महापालिकेची दंडात्मक कारवाई

५ महिन्यात पालिकेने केला २७ लाख ४८ हजार रुपये एवढा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ आवर्जून परिधान करण्याचे पुन्हा एकदा आवाहन

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) ‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर ‘मास्क’ (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ‘मास्क’चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये १ हजार पर्यंत दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे ‘मास्क’ वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणा-या किंवा चेह-यावर मास्क न लावणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई दि. ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे.

या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून आता अधिकाधिक नागरिक ‘फेसमास्क’ वापरताना दिसून येत आहेत. दि. ९ एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान ‘मास्क’ न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या २ हजार ७९८ नागरिकांकडून रुपये २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ‘फेसमास्क’ योग्यरित्या परिधान न करणा-या व्यक्तींना समज देण्याची कार्यवाही (वॉर्निंग केसेस) देखील करण्यात येत असून यानुसार ९ हजार ९५४ प्रकरणी समज देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.
..
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना ‘मास्क’ विषयक दंडात्मक कारवाई ही विभागास्तरावर करण्यात येत आहे. दि. ९ एप्रिल २०२० ते दि. ३१ ऑगस्ट २०२० या सुमारे ५ महिन्यांच्या कालावधी दरम्यान सर्वाधिक म्हणजेच रुपये ५ लाख ४ हजार इतकी दंड वसूली ही ‘के पश्चिम’ विभागाद्वारे करण्यात आली आहे. त्या खालोखाल रुपये ४ लाख २१ हजार इतका दंड ‘आर दक्षिण’ विभागात तर रुपये ४ लाख ८ हजार ५०० इतका दंड ‘सी’ विभागाद्वारे वसूल करण्यात आला आहे.
..
९ एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीदरम्यान सर्वाधिक म्हणजेच रुपये ९ लाख ४५ हजार एवढा दंड ‘मे २०२०’ या महिन्यात वसूल करण्यात आला आहे. तसेच रुपये ५ लाख ८८ हजार एवढा दंड ‘जून’ महिन्यात, तर रुपये ४ लाख ८२ हजार ७०० इतका दंड ‘एप्रिल’ महिन्यात वसूल करण्यात आला आहे. मे २०२० मध्ये विनामास्क विषयक कारवाई अंतर्गत ९५३ व्यक्तींकडून दंड वसूली करण्यात आली. तर जून २०२० मध्ये ५८९ प्रकरणी आणि एप्रिल २०२० मध्ये ५२३ प्रकरणी दंड वसूली करण्यात आली आहे.
..

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.