चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यात कोविड-१९ विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘नो मास्क – नो एन्ट्री’ मोहिमेची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॅण्ड परिसर, पंचायत समिती चौक, धनवाडी फाटा चौफुली, पंकजनगर स्टॉप, कारगिल चौक, आशा टॉकीज चौक, गोल मंदिर चौक, तहसील कार्यालय, चिंच चौक आदी ठिकाणी शहर पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेस हातभार लागावा तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी रोटरी क्लब चोपडातर्फे शहरात विना मास्क फिरणाऱ्या तब्बल दोन हजार नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
चोपडा शहरात आतापर्यंत मास्क न घालता फिरणाऱ्या व रस्त्यांवर विना मास्क मोटरसायकल चालविणाऱ्यांकडून तसेच सोशल डिस्टसिंगचा भंग करणाऱ्या अशा सहाशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन १ लाख २० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

सदर मोहिम लोक चळवळ व्हावी म्हणून चोपडा रोटरी क्लबने चोपडा केळी व्यापारी संघटनेच्या सहकार्याने पोलिस यंत्रणेला मदत करण्यासाठी रोटरी क्लबमार्फ़त ही मोहीम राबवित विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीना तब्बल दोन हजार मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रूपेश पाटील, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, एम. डब्ल्यू. पाटील, संजय शर्मा, आरिफ शेख, सुरेश पाटील, विलास कोष्टी उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात विना मास्क फिरून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोरोना संसर्गवाढीसाठी मदत करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात ही विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. यामुळे कोरोनाला आळा बसला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. शहरात व ग्रामीण भागात अशीच धडक कारवाई काही दिवस सुरू राहिली तर निश्चितच चोपडा तालुक्यातून शंभर टक्के कोरोना हद्दपार होईल.
आरोग्य यंत्रणेने घेतलेली काळजी, रोटरी क्लबचे सहकार्य आणि शहर पोलिसांची ‘नो मास्क – नो एन्ट्री’ मोहीमेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे.
शहरातील रोटरी क्लब तसेच सामाजिक व राजकीय प्रतिनिधीची बैठक घेऊन ‘नो मास्क – नो एंट्री’ ही संकल्पना लोक चळवळ व्हावी, लोकांनी 100% मास्क वापरून कोरोनाला हरवावे तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर ‘नो मास्क – नो एंट्री’चा फलक लावून कडक अंमलबजावणी करुन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. मास्क न वापरणाऱ्या ग्राहकास कोणतीच वस्तु देऊ नये, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे.
