चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ व भूमिपूजन माजी नगराध्यक्ष व संघाच्या बांधकाम समितीचे उपाध्यक्ष श्री रमणलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.
एक हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येणार असलेल्या ह्या सभागृहात बैठक व्यवस्था, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लायब्ररी व इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचे आवाहन केले आहे. संघाच्या वतीने आगामी काळात कार्यालय परिसरात कंपाऊंड वॉल, स्वागत गेट तसेच अद्ययावत कार्यालय उभारणी केली जाणार असल्याची माहिती या वेळी संघाचे उपाध्यक्ष श्री एम. डब्ल्यू. पाटील यांनी दिली.
या वेळी प्रास्ताविक व स्वागत सचिव श्री प्रमोद डोंगरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. याप्रसंगी शेतकी संघ अध्यक्ष श्री एल. एन. पाटील, बांधकाम समिती सदस्य दिलीप माधवराव पाटील, प्रभाकर बैरागी, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, आर्किटेक्ट नितीनभाई गुजराथी, राजेंद्रभाई गुजराथी, शिरिषभाई गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
