• Fri. Jul 4th, 2025

चोपडा बसडेपोतून चोपडा-बडोदा बससेवेस मुहूर्त

चोपडा प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश; पुण्याच्या रातराणीचाही फेरीत समावेश

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चोपडा बस डेपोमधून सुटणाऱ्या आंतरराज्य सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, आता प्रवाशांच्या सोयीसाठी गुजरात राज्यात बस फेरी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी चोपडा प्रवासी संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष एडवोकेट एस. डी. काबरे आणि सरचिटणीस अनिलकुमार द्वारकादास पालीवाल यांनी मागणी लावून धरली होती. अखेर चोपडा आगार व्यवस्थापक श्री. क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे चोपडा-अकोला, चोपडा-बदलापूर, चोपडा-बडोदा, चोपडा-पुणे (रातराणी) आणि चोपडा-लातूर या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

अनेक दिवसांपासून प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराज्य बससेवा सुरू झाल्यामुळे आता प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे. चोपडा आगारातून मध्य प्रदेशमधील इंदोर तसेच इतर बससेवा सुरू करावी, अशी मागणी चोपडा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष एस. डी. काबरे आणि सरचिटणीस अनिलकुमार पालीवाल यांनी केली आहे.

चोपडा आगारातून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या बसफेऱ्या, त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…

चोपडा-अकोला बसफेरीची वेळ सकाळी – सहा वाजता असून, प्रवासी भाडे तीनशे रुपये आहे. ही बस यावल, भुसावळ, मलकापूर, खामगाव यामार्गे जाईल,

चोपडा-बदलापूर ही बस सकाळी सव्वा सात वाजता सुटेल. या बसचे भाडे आहे पाचशे रुपये असून, ही बस धुळे, नाशिक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी यामार्गे जाईल.

चोपडा-बडोदा आंतरराज्यीय बस सेवादेखील सुरू करण्यात आलेली आहे. चोपडा-बडोदा बस सकाळी साडेपाच वाजता चोपडा डेपोतून सुटेल. याचे भाडे ३६० रुपये असून, ही बस शिरपूर, शहादा, अंकलेश्वरमार्गे जाईल.

पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
चोपडा-पुणे रातराणी बससेवेलाही आता मंजुरी देण्यात आलेली आहे. ही बस सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी चोपडा बस डेपोतून सुटेल. या बसचे भाडे सहाशे पंचवीस रुपये असून, ही बस धुळे, शिर्डी, नगरमार्गे जाईल.

पाचव्या बस फेरीत चोपडा-लातूर या बससेवेचा समावेश असून, ही बस सकाळी सहा वाजता सुटेल. ६२५ रुपये असे या बसचे भाडे असेल. ही बस जळगाव, सिल्लोड, जालना, बीड, आंबेजोगईमार्गे जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक क्षीरसागर यांनी दिली आहे.

बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी तसेच चोपडा प्रवासी संघटनेतर्फेही चोपडा आगाराचे आभार मानण्यात आले आहे. मात्र, येत्या दिवसात मध्यप्रदेशसाठीच्या पूर्ववत कराव्या अशी मागणीही करण्यात आलेली आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.