• Sun. Oct 5th, 2025

नवसाला पावणारे लासुर येथील श्रीक्षेत्र नाटेश्वर मंदिर

परेश दिलीप पालिवाल, लासुर

निसर्गाची देणं असलेल्या सातपुडा पायथ्याशी वसलेले नाटेश्वर हे पुरातन मंदिर.लासुर गावापासून 2 कि मी अंतरावर असून ग्रामस्थांची तसेच परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत आहे.इथे मानलेला नवस पूर्णत्वास येतोच असा ग्रामस्थांना आलेला अनुभव आहे.अतिप्राचीन मंदिरांपैकी एक नाटेश्वर मंदिर शके 1146 मध्ये जीवपाल यांचा मुलगा गोपालचंद याने बांधले तसेच जीवपाल हा तत्कालीन मराठा किंवा वाणी जातीच्या असावा असा उल्लेख शिलालेखात आहे.हा शिलालेख पुणे येथील वास्तू संग्रहालयात असल्याचे सांगितले जाते.
    संपूर्ण पणे दगडी कोरीव कामात साकारलेले नाटेश्वर देवस्थान मनाला रोमहर्षक आनंद दिल्याशिवाय राहत नाही.भारतीय संस्कृती तसेच उत्कृष्ठ स्थापत्याचा नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.इतिहासाची पाने चाळणाऱ्यांना हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे वाटत असले तरी मंदिराची दगडी मांडणी लक्षात घेता कमीतकमी ८०० वर्ष पुरातन असावे असा अंदाज आहे.
      नाटेश्वर मंदिराचे सुमारे 40 वर्षापूर्वीचे कमानीदार प्रवेशद्वार काढुन आता कमान बनवण्यात आली आहे.नाल्याच्या खोलगट भागात व रस्त्याला लागून असलेल्या समोरचा पटांगणात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले असून मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.आतापर्यंत अनेक विवाहकार्य इथे झाली असून आताही दरवर्षी शिवलग्न येथे पार पडतात.नाटेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून कमानीतून वर चढल्यावर डाव्या बाजूला दीपमाळ व माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी व माजी आ.कैलास पाटील यांचा निधीतून बांधण्यात आलेले सभामंडप आहे.
      मंदिराचा आतील भागात 4 दगडी स्तंभ असून त्यापैकी दोघांवर दगडी वेलबुट्टीचे काम व दोन स्तंभावर पोपटाचा आकृत्या आहेत.मंदिराचा गाभारा खोलगट असून त्यात जुनी शिवपिंड आहे.मंदिराचा बाहेरचा भागात देखील प्राचीन नंदी व जुनी शिवपिंड आहेत ते चिंतेश्वर महादेव म्हणून प्रचलित आहे.बाहेर एक दगडी बांधकामाची विहीर असून कितीही दुष्काळ आला तरी त्या विहिरीचे पाणी आटत नाही अशी अख्यायिका आहे.मंदिराचा मागील बाजूस एक पुरातन पायविहिर असून तिला सासु-सुनेची विहीर म्हणून संबोधले जाते.श्री नाटेश्वर मंदिराच्या उत्तरेला अगस्तीमुनी महाराज यांचे समाधीस्थळ असून भाविकांच्या माध्यमातून जिर्णोद्धाराच्या संकल्प शिवभक्त पंकज महाजन यांनी केला आहे.
  मंदिराची पर्यटन विकास अंतर्गत नोंद होऊन मागील बाजूस लहान मुलांसाठी बगीचा तसेच वनविभागामार्फत भाविकांना बसण्यासाठी पॅगोडा बनवण्यात आले आहे.लासुर तसेच परिसरातील भाविकांच्या देणगीतून मंदिराची विविध विकासकामे केली जातात.मंदिरावर महाशिवरात्रीला ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात असून त्यासाठी चोपडा येथील प्रशांत क्लासेसचे संचालक प्रशांत सोनवणे,श्री.सोमाणी सहकार्य करतात.त्याचप्रमाणे देणगीदारांचा देणगीतून दर श्रावण सोमवारी साबुदाणा खिचडी,दूध,लाडूवाटप केली जाते.पूर्ण श्रावण महिना महाराष्ट्र,गुजरात व मध्यप्रदेश येथील भाविक इथे नवस देण्यासाठी येतात.
  अलीकडचा काळात जि.प.सदस्य हरीश पाटील यांचा निधीतून भाविकांसाठी पिण्याचा पाण्याची टाकी तसेच मंदिर परिसरात शेडचे बांधकाम,सौरऊर्जा दिवे तसेच भाविकांना बसण्यासाठी बाक बसविण्यात आले आहे.मंदिरात पुजारी म्हणून राजू महाराज काम पाहतात तर मंदिराची देखरेख महेंद्र गुरव,रवींद्र गुरव,अरुण नगीनदास पालीवाल यांच्याकडे आहे.त्यांना श्रीराम पालीवाल,सुंदरलाल शर्मा,अनिल पाटील,वाल्मिक कडू पाटील,सुरेश महाराज,सुरेश महाजन,अरुण पाटील,बुटलाल भोई,उपेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.