पाचोऱ्यात एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पाचोरा (साथीदार वृत्तसेवा) पाचोरा पंचायत समिती पुरस्कृत तालुकास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१’ यावर्षी पालिवाल समाजाचे युवा कार्यकर्ते पंकज राधेश्याम पालिवाल यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लोहारा येथील पालीवाल समाजाचे युवा कार्यकर्ते पंकज पालीवाल हे लोहारा पालीवाल समाजाचे सक्रिय सदस्य असून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे प्रसिद्धीप्रमुख आहेत. त्यांना या अगोदरही वेगवेगळ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ११ सप्टेंबर रोजी आयोजित या समारंभाप्रसंगी मधुभाऊ काटे (जि. प. सदस्य), वसंतजी गायकवाड (पं. स. सभापती), श्रीमती अनिताताई चौधरी (उपसभापती), पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान आण्णा पाटील आणि श्रीमती सरोज गायकवाड मॅडम उपस्थित होते.
या कार्यक्रमात पाचोरा तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श शिक्षक व शाळांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये लोहारा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा शहापुरा शाळेतील पंकज पालीवाल यांना २०२१ चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोरोनाकाळात राबविलेल्या उपक्रमांची दखल
कोरोनाकाळात शाळा बंद असताना जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभागाच्या आपला जिल्हा, आपले उपक्रम या पुस्तकांची निर्मितीची संकल्पना पंकज पालीवाल व अरुणा उदावंत मॅडम यांनी मांडून जळगाव जिल्हयातील उपक्रमशील शिक्षकांची भाग 1 ते 5 e-book पुस्तकांची निर्मिती करून उपक्रमशील शिक्षकांना प्रेरणा दिली.
कोरोनाकाळात शाळा जरी बंद होत्या ग्रामीण भागातील सर्व मुलांना ऑनलाइन शिक्षण देणे शक्य नसताना ऑफलाईन देण्यासाठी घर घर शाळा उपक्रम राबवून तसेच ओट्यावरची शाळा भरवून मुलांना ऑफलाइन शिक्षण देत मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी सरांनी स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप करून त्यांच्याकडून सर्व स्वाध्याय सोडवून घेतले. शाळा बाहेरची शाळा, व्हाट्सएप स्वाध्याय, ऑनलाइन शाळेसह इतर शालेय उपक्रम मुलांसाठी राबवून सर मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच शाळेच्या भौतिक विकासात लोकसहभागातून शाळेला रंगरंगोटी केली, शाळेला तारेचे कंपाउंड मिळवले. शालेय बाग तयार केली. वृक्षारोपण करून शाळेचे सौन्दर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल पंचायत समितीने घेऊन त्यांना ‘पाचोरा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक’ म्हणून सन्मानित केले.
शिक्षकांसह समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर पाटील सर, शहापुरा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप राजपूत, शहापुरा सरपंच योगेश राजपूत तसेच लोहारा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी पंकज पालीवाल यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साथीदार न्यूज डॉट कॉम परिवारातर्फे पंकज यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.