• Sat. Jul 5th, 2025

चोपडा महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात A+ मानांकन

उत्तर महाराष्ट्रासह चोपडयाच्या शिरपेचात महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेद्वारा (नॅक) तिसऱ्या सायकल साठी A+ मानांकन मिळाले. संख्यात्मक आनलाईन परीक्षण झाल्यानंतर दि.१५ ते १६ सप्टेबर २०२१ दरम्यान त्रिसदस्यीय नॅक पीयर टीमने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली होती.

 नॅकने मूल्यांकनात अधिक पारदर्शकता येण्यासाठी जुलै २०१७ पासून मूल्यांकन पद्धतीत  आमूलाग्र बदल केला असून, नवीन प्रणाली नुसार आजतगायत कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि. जळगाव परिक्षेत्रात झालेल्या महाविद्यालयांच्या मुल्यांकन व मानांकनात सर्वाधिक ३.३१ सी.जी.पी.ए. मिळवत A+ ग्रेड असे मानांकन प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय ठरले आहे.

महाविद्यालयास मूल्यांकन अहवालात १) अभ्यासक्रम रचना व अंमलबजवणी यात ४ पैकी ३.५० तर २) अध्यापन व मूल्यमापन ३.२५ ३) संशोधन कार्य ३.०० ४) शैक्षणिक व पायाभूत सुविधा ३.७६ ५) विध्यार्थी विकास व सहाय्य ३.४२ ६) नेतृत्व, प्रशासन व व्यवस्थापन ३.३७ ७) महाविद्यालयीन मूल्य व उत्कृष्ट उपक्रम ३.१४ या प्रमाणे निर्धारित सात निकषात सि.जी.पी.ए. मिळवत एकूण सरासरी ४ पैकी ३.३१ सि.जी.पी.ए. प्राप्त केला आहे.

अभ्यासक्रम रचना व अंमलबजावणी अंतर्गत मूल्यवर्धित, रोजगारभिमुख कौशल्य निर्माण करणाऱ्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यापीठातील अभ्यास मंडळ अध्यक्ष व सदस्य म्हणून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच महाविद्यालयाने ऑनलाईन फीडबॅक प्रणाली विकसित करून त्याद्वारे अध्ययन, अध्यापन व पायाभूत सुविधांबाबत आजी- माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून वेळोवेळी सुधारणांबाबत मते जाणून कार्यवाही केली आहे.

महाविद्यालयात मागील पाच वर्षात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नाविन्यपूर्ण पद्धतींचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यासाठी मदत झाली आहे. दूरदृश्य प्रणालीचा वापर, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती व सुसज्ज प्रयोगशाळा यामुळे अध्ययन-अध्यापन पद्धतीत रचनात्मक व गुणात्मक विकास करता आला आहे.

महाविद्यालयाने मागील पाच वर्षात १२ आय.सी.टी. क्लासरूम, विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २ काँमन रूम, अंतर्गत ट्रीमिक्स रस्ते, गांडूळ खत प्रकल्प, जल पुनर्भरण प्रकल्प, ३६ किलो वॅटचा सौर उर्जा संच, ४०० मीटर रनिंग ट्रॅक, इनडोर मल्टी जिम, अद्ययावत, समृद्ध व भव्य ग्रंथालय आदी शिक्षण पूरक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमात सर्वोच्च कामगिरी करत विद्यापीठाकडून सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. तसेच कला क्षेत्रातील एकांकिका स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, युवारंग स्पर्धा आदींमध्ये राज्य स्तरावरील तर, क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे प्राप्त केली आहेत. संशोधन कार्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांना यु.जी.सी. व तत्सम संस्थांकडून २१ लाख रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले असून, सर्व विद्याशाखातील प्राध्यापकांनी २३४ विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केलेले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने रोजगार मार्गदर्शन व नियुक्ती केंद्राची स्थापना करून त्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा मिळण्यासाठी इन्कूबेशन केंद्राची स्थापना देखिल केली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मा.आ.डॉ. सुरेश जी. पाटील व महाराष्ट्र राज्याचा माजी शिक्षण मंत्री कै.ना. सौ. शरदचंद्रिकाअक्का सुरेश पाटील यांच्या प्रेरणेने व संस्थेचे अध्यक्ष अॅड संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीलप्रमाणे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून निरंतर व शाश्वत गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील राहत महाविद्यालयाने यशोशिखर गाठले आहे.

या उत्तुंग यशासाठी परिश्रम घेणारे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, प्र.प्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, प्र.रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील, अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीचे समन्वयक प्रा.दिनानाथ पाटील, तंत्रस्नेही डॉ.लालचंद पटेल यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष श्रीमती आशा विजय पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील व संचालक प्रा.डी.बी.देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.