• Sat. Jul 5th, 2025

‘लाल परी’मुळे अनेकांची आपल्या कुटुंबाशी भेट

जिल्ह्यातून १५ हजार मजुरांना सोडले; राज्याच्या सीमेवर पोहोचविले

नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाउनमुळे अडकेलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’द्वारे जिल्ह्यातून 18 हजार मजूर आणि नागरिकांना  शेजारील राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले, त्यापैकी फक्त नवापूर येथून 15 हजार प्रवाशांची सुविधा गेल्या आठवडाभरात करण्यात आली.

गुजरात येथे काम करणारे हजारो मजूर नवापूर येथे  राज्याच्या सीमेवर अडकले होते. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक प्रशासनाने त्यांच्या प्रवाशासाठी  नियोजन केले. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रवासाचे मार्ग व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. सर्व प्रवाशांना बसेसद्वारे नियोजनपूर्वक विविध ठिकाणी पाठविण्यात आले.

सर्वाधिक प्रवाशांना मध्यप्रदेश सीमेवर बिजासन येथे सोडण्यात आले. हे सर्व मजूर उत्तर भारतातील होते. त्यासाठी ५६८ बसेस सोडण्यात आल्या. प्रत्येक बसेमध्ये साधारण २२ मजुरांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाठविण्यात आले. बंगाल आणि ओरिसाकडे जाणाऱ्या मजूरांना गोंदियापर्यंत ७८ बसद्वारे सोडण्यात आले. नंदुरबार आगाराच्या बसेसचा हा सर्वात लांबचा प्रवास होता.

याशिवाय खेतीया १४,  नांदेड १, वाशीम २, खामगाव १, अकोल ४, चंद्रपूर १, औरंगाबाद १, यवतमाळ १, नागपूर ३, भंडारा २, वर्धा १ गडचिरोली १, उमरगा १, परभणी १ आणि बीड येथे १ बसद्वारे प्रवाशांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक बसेसची सुविधा नवापूर येथूनच करण्यात आली आहे.  नवापूर येथून एकूण १५ हजार ५७२ प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या स्थळापर्यंत पोहोचविण्यात आले.

सूक्ष्म नियोजन आणि सहकार्याची भावना
धुळे आणि साक्री आगारातूनही बसेस मागविण्यात आल्या होत्या. प्रत्येक बससाठी प्रवाशांची यादी करणे, प्रवाशांची संपर्क, त्यांची वैद्यकीय तपासणी याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.  जय गुरुदेव संस्थेतर्फे मजुरांना प्रवासात भोजन पाकीट देण्यात आले, तर उल्टीचा त्रास हेाऊ नये यासाठी महिलांना औषधी गोळ्याही प्रशासनातर्फे देण्यात आल्या. त्यासाठी नायब तहसीलदार राजेंद्र नजन आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नियोजनात महसूल, पोलीस, नगरपालिका, आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी सहभाग घेतल्याने   प्रशासनाला हे मोठे आव्हान पेलता आले आहे. मजूरांची संख्या अधिक असल्याने टोल नाका परिसरात ही सर्व व्यवस्था करण्यात आली. २२ प्रवाशांची नोंदणी पूर्ण होताच वाहनचालकाला सूचना दिली जात असे व त्यांच्याकडे प्रवाशांची स्वाक्षरीत यादी देऊन प्रवास सुरू होत असे. श्री.देवरे यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत,  गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनीदेखील महत्वाची भूमीका बजावली आहे. स्वयंसेवी संस्थेने या मजुरांच्या भोजनाची सोय केली होती.

फिलीपाईन्समधून विद्यार्थी सुखरूप परतले
फिलीपाईन्समधून २१ विद्यार्थी अहमदाबाद  विमानतळावर पोहोचले. सर्व विद्यार्थी तापी जिल्ह्यात आले असताना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना विद्यार्थ्यांना स्वीकारण्याविषयी विचारणा केली. डॉ.भारुड यांनी तात्काळ त्यादृष्टीने सुचना दिल्या.  १२ मे रोजी रात्री दहा वाजता हे विद्यार्थी नवापूर येथे पोहोचले. यातील नवापूर-नागपूर मार्गावर 11 आणि नवापूर-नांदेड मार्गावर १० विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील क्वॉरंटाइन केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले.

जिल्ह्यातील इतर भागातूनही एसटी धावली
जिल्ह्यातील इतरही आगारातून २९ बसद्वारे प्रवासी मजुरांची व्यवस्था करण्यात आली. यात शहादा येथून खेतीयासाठी २ तर भुसावळसाठी ३ बस सोडण्यात आल्या. नंदुरबार येथून बिजासनसाठी १०, खेतीया ९, परभणी १, गोंदीया २ आणि भुसावळसाठी २ बस सोडण्यात आल्या. एकूण २,९४३ प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या स्थानापर्यंत सोडण्यात आले.

जिल्ह्यातील नागरिकांनाही गावी आणले
औरंगाबाद आणि नांदेड येथून दहा बसद्वारे २५० नागरिक, पुणे २० बसद्वारे ४९१, जुनागढ  येथून नंदुरबार स्थानकावर आलेले १३२० नागरिक ४४ बसद्वारे आणि गुजरातमधील जामनगर, द्वारका, हरीपुरा, दहेगाम, गांधीनगर, राजकोट येथे ९ बस पाठवून २२५ नागरिकांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी सोडण्यात आले. असे एकूण ८३ बसेसद्वारे २,२८६ नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचविण्यात आले.

नवापूर येथून सर्वप्रथम 10 तारखेला 6 बसेस बिजासन येथे प्रवाशांना घेऊन गेल्या. त्यानंतर गुजरात येथून पायी किंवा वाहनाने येणाऱ्या प्रवाशांची नियमांचे पालन करीत सोय करण्यात आली. सर्वाधीक 200 बसेस 18 मे रोजी सोडण्यात आल्या. तर 17 मे रोजी 143 बसेस सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एका बसमध्ये 20 ते 22 प्रवासी बसविण्यात येत आहेत.

संकटकाळातील मोठ्या मोहिमेत सहभागी झाल्याचे आमच्या प्रत्येक वाहनचालकाला समाधान आहे. एसटी सामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी जोडली गेली आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. प्रवाशांचा त्रास कमी करून त्यांना एसटीमुळे त्यांच्या कुटुंबियांना भेटता आले याचा आनंद प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे.
मनोज पवार, आगार व्यवस्थापक, नंदुरबार

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.