• Sat. Jul 5th, 2025

चोपडा महाविद्यालयात  ‘लेखक आपल्या भेटीला’ नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन

कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली ‘आकांक्षा’ कथेवर सविस्तर चर्चा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी कथालेखक कादंबरीकार व कवी राजेंद्र पारे, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ तसेच सौ. एम. टी. शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. एम. एल. भुसारे यांनी करून दिला.
   

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रथम वर्ष कला वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी ‘खान्देशी कथा’ नेमण्यात आल्या आहेत. ‘खान्देश कथाप्रबोध’ या मराठी अभ्यास मंडळ संपादित पुस्तकांमध्ये साहित्यिक राजेंद्र पारे यांची ‘आकांक्षा’ ही अभ्यासक्रमास नेमलेली कथा समाविष्ट केली आहे. विद्यार्थ्यांना या कथेची पार्श्वभूमी तसेच निर्मिती प्रक्रिया व प्रेरणा स्वतः लेखकाकडून जाणून घेता यावी, या उद्देशाने मराठी विभागातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी कथालेखक राजेंद्र पारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,  ‘लेखकाचे लेखन आणि लेखकाचे जीवन यात फरक असतो. ‘आकांक्षा’ या कथा लेखनाचा काळ पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा असून, या कथेत गतकालीन घटनांना मूर्त रूप दिले आहे. खेड्यातील दीक्षा नावाच्या विद्यार्थिनीला शहराविषयी आकर्षण वाटते व ती अभिनेत्री होण्याच्या आकांक्षेने शहरांमध्ये जाते. परंतु, तेथील वातावरण पाहून व वाट्याला आलेला अनुभव पाहून तिच्या आकांक्षेचा चुराडा व भ्रमनिराश होतो. थोडक्यात वर्तमानपत्राच्या जाहिरातीतील फसवेगिरीचे वास्तव चित्र ‘आकांक्षा’ नावाच्या कथेत रेखाटले आहे. त्याचबरोबर संपतराव जाधव यांचे सुधारणावादी विचार प्रतिबिंबित केले आहेत. आजची महाविद्यालयीन पिढी कमी वेळात प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात, झगमगटाच्या दुनियेत फसतात, त्यांना ही कथा वास्तवाचे भान निर्माण करून देणारी आहे. यावेळी कथालेखक राजेंद्र पारे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.
    

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की,  ‘विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखकाकडून साहित्य निर्मिती संकल्पना, प्रेरणास्रोत जाणून घेता यावेत व लेखकाचे अनुभव जवळून ऐकता यावेत ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील विभागाची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे’.
     

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले, तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.