१ आक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगभर पाळला जातो. वाढत्या आरोग्य सेवा, नवनवीन तंत्रज्ञानाने मेडिकल सायन्सची होणारी प्रगती, याच्या परिणामी ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढत आहे. त्याचबरोबर समस्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या भविष्याचा वेध घेतला तर, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुसह्य करणे आवश्यक आहे.
निराधार ज्येष्ठांसह सर्व ज्येष्ठ नागरिकांची उर्जितावस्था कशी होईल, ६० वर्षावरील प्रत्येक बंधू भगिनींची आयुष्याची संध्याकाळ सुखात कशी जाईल, या करिता काय करता येईल, याचा उहापोह व्हायला हवा.
शैक्षणिक क्रांती, वाढते शहरीकरण, परदेशगमन, लुप्त होत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती, कुटुंब नियोजनामुळे आक्रसलेले कुटुंब, बिल्डर धार्जिण्या सरकारमुळे निवासी जागेच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, वाडा संस्कृती लयाला जाऊन, ज्येष्ठांना घरात जागा नाकारणारी, वनरुम-टुरुम-किचनची वाढणारी पिलावळ, वाढती लोकसंख्या व विकासाभिमुख औद्योगिकीकरण, या व त्या अनुषंगाने येणाऱ्या असंख्य अडचणीत, वृध्दांना न्याय देण्यासाठी सरकारने जो पुढाकार घ्यायला हवा, या उलट त्याची जबाबदारी झटकणारे, जेष्ठांच्या एफडीच्या पुंजीच्या व्याजावरही टॅक्स बसवून वसुली करणारे सरकार, ठराविक वयानंतर वृध्दांना आरोग्य विमा नाकारणारे सरकार, खेड्यात नसणाऱ्या, व शहरात न परवडणाऱ्या महागड्या झालेल्या आरोग्य सेवा, निरांकुश, अनियंत्रित वाढणाऱ्या औषधांच्या किंमती, या सर्वांचा परामर्श घेतला तर, या सर्व अडचणी वर मात करण्यासाठी ज्येष्ठांनीच आता आपल्या हक्काकरिता प्रयत्नशील होणे आवश्यक आहे.
प्राणीमात्रावरही दया करणारी आपली भारतीय संस्कृती, परंतु ज्येष्ठांच्या सोयी सवलतींच्या बाबत लकवा भरल्यासारखी कां होते, या सामाजिक प्रश्नांचे उत्तर कुणाकडेच नाही.
पूर्वी आत्ता परवा-परवा पर्यंत भल्यामोठ्या एकत्रित कुटुंबाचा सन्मान, हा अभिमानाने मिरवला जात असे, कुटुंब प्रमुखाची मर्जी सांभाळण्याची, अहमहिका कुटुंब सदस्यांत लागत असे, त्याचा शब्दच परवलीचा असे, अजूनही असे कैक कुटुंब आपले अस्तित्व टिकवून आहे. ज्येष्ठांपुढे या व अनेक धगधगत्या ज्वलंत समस्या उभ्या ठाकलेल्या आहे. या सर्वांचा विचार करताना ज्येष्ठ नागरिक चळवळीच्या भविष्यातील धोरणांचा दृष्टिकोन ठरवायला हवा.
समुपदेशन-प्रबोधन
एकत्र कुटुंबाचे फायदे, आजच्या नव्या पिढीला, नातवंडांना सुसंस्कारीत करित पटवून द्यायला हवे. आजी-आजोबांच्या सान्निध्यात राहिल्याने नातवंडांना होणारे फायदे, हेच भविष्यातील आपलेही तारणहार होणार हे मर्म आजच्या तरुण पिढीने समजून घ्यायला हवे, व आपल्या मुलांवर तसे संस्कार घडवायला हवे, आजच्या मुलांनी- आई-वडिलांच्या व आजच्या सुनांनी, सासू सासऱ्यांच्या वृध्दत्वावर न हसता, सेवाधर्माचे आपले कर्तव्य पालन अंगीकारायला हवे.
नाहीतर-
*नको हसुं मला…तीच गत तुला…*
हा विधी चा नियम विसरता कामा नव्हे.
वृध्दाश्रम
खरेतर वृध्दाश्रम हे भारतीय संस्कृतीला लांच्छन आहे, तरीही निराधार,एकाकी, अपंग, विकलांग, जराजर्जर वृध्दांकरिता याची गरज अपरिहार्य आहे, मेडिकल सायन्स च्या प्रगतीमुळे मानवाचे आयुष्यमान वाढत आहे, साहाजिकच वृध्दांची संख्याही वाढत आहे, या करिता वृध्दाश्रम ही आज काळाची गरज आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आस्तित्वात असलेले वृध्दाश्रम कमी पडत आहे, म्हणून प्रत्येक १०/५ गावच्या परिसरात प्रथमोपचारासह सर्व सोयींनी युक्त, नैसर्गिक वातावरणात, ज्येष्ठांच्या करमणुकीच्या साधनासह निशुल्क, व अनुदानित वृध्दाश्रम बनविणे, आयुष्यभर मजूरी करणारे, निराश्रित, निराधार, विना पेन्शन धारक, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, कमाल पेन्शन, निवारा, आरोग्य, सुरक्षा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे, रयतेची म्हणजेच जनतेची काळजी घेणे हा स्वराज्याचा बाणा, छत्रपतींची शिकवण, निदान महाराष्ट्र राज्याच्या सरकारने तरी पाळायलाच हवी.
अनेक सेवा भावी संस्थाही या शुभकार्यात आपले योगदान देऊ शकतात.
सरकार दबावतंत्र
वास्तविक पाहता बहुतेक मंत्रीगण ६०+ असतात, म्हणजेच ते ज्येष्ठ नागरिक या संज्ञेत मोडतात. परंतु, ज्येष्ठांचे उर्वरित जीवन सुखमय होण्याकरिता, कल्याणकारी विधेयक मांडून आपण पारित करून घ्यावे, ज्येष्ठांचे जीवनमान सुसह्य कराव, व आपणही ज्येष्ठ नागरिक झाल्यावर याचा फायदा स्वतःही घ्यावा, असे अद्याप तरी होत नाही, ज्या काही तुटपुंज्या सवलती दिल्या. त्याची मात्र उपकार म्हणून जाणिव करून दिली जाते.
जवळजवळ महाराष्ट्र राज्यात सव्वा ते दीड कोटी ज्येष्ठ नागरिक विखुरलेले आहेत, देशात १३-१४ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. मतदार संख्येच्या साधारणतः ११/१२% ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, परंतु त्यांना राजकीय वाली नाही, सरकार दरबारी प्रतिष्ठा, सन्मान, प्रतिनिधित्व नाही. याचे कारण आपण एकसंघ नाही, खूप मवाळ, शारीरिकदृष्ट्या खूप दुर्बल आहोत. याची जाणिव सरकारला आहे, आयुष्यात आपण केलेले कष्ट, नव्या पिढीकरिता, मुलाबाळांच्या खाल्लेल्या खस्ता याचा विचार आज आपणास प्रतिनिधित्व नसल्याने आपण मांडू शकत नाही, ११ ते १२% ज्येष्ठांच्या योजनाबद्ध एकसंघ दबावतंत्राच्या खेळीमुळे हे मात्र शक्य होऊ शकते.
एकसंघ व्हा—आपली निकड, आपले अंधकारमय भविष्य ही भावना उराशी बाळगून, भले आपली स्वार्थी भावना कां म्हणा, पण या करिता सर्व ११-१२% टक्के ज्येष्ठ नागरिकांनी एकाच झेंड्याखाली एकत्र यावयास हवे, हा झेंडा म्हणजे “फेस्कॉम” चा.
अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ राष्ट्रीय पातळीवर
‘फेस्कॉम’ हा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्वव्यापी महासंघ, १९८० ला स्थापना झाल्यापासून ४३ वर्ष सेवेत कार्यरत आहे. संपूर्ण राज्यात, महिला व पुरुष मिळून ५५००/- चे आसपास संघ, १२ प्रादेशिक विभाग आहेत, ते आता १४ होत आहे. १३ लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनीं सभासद असा प्रचंड व्याप सांभाळत, प्रत्येक ज्येष्ठांच्या सामाजिक समस्या, शासकीय समस्या, आर्थिक लाभाच्या योजना, ज्येष्ठांसाठी उपयुक्त कायदे, विधी तज्ज्ञांकडून कायदे विषयक मोफत सल्ले, व्यक्तीगत पातळीवर समस्यासुद्धा निवारण करण्यासाठी सहकार्य करणारा, वटवृक्षसारख्या अनेक पारंब्या-धारण केलेला महासंघ आहे.
जोपर्यंत फेस्कॉमचे ‘गांव तेथे संघ’ हे उदिष्ट पूर्णत्वास जात नाही
समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना, सरत्या आयुष्यात सुखनैव जीवन जगता येत नाही, तोपर्यंत महासंघाचे उदिष्ट पूर्ण होणार नाही.
महाराष्ट्रातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी (“फेस्कॉम” च्या) महासंघाच्या छत्रछायेखाली येणे गरजेचे आहे, “गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ” ही “फेस्कॉम” ची संकल्पना आहे, ती कागदावर न राहता प्रत्यक्षांत उतरायला हवी. याकरिता सक्रिय, सक्षम ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते तयार करणे, ज्येष्ठ नागरिक चळवळीचा आवाज बुलंद करणे, या शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या उर्जितावस्थेला पर्याय नाही, भविष्य नाही.
मदत कायद्याची— या दुनियेत हवसे, नवसे, गवसे सर्व प्रकारचे लोक राहतात. मातृपितृ भक्त, सोबत मातापित्यांच्या इस्टेटीवर हक्क सांगणारे, डल्ला मारणारे, सुपुत्र-कुपुत्र दोन्हीही आहेत, भक्त पुंडलिकासारखे सेवाभावी पुत्रही आहेत, तसेच जीवनदात्या मातापित्यांची जन्मभराची पुंजी लाटून वाऱ्यावर सोडून देणारी राक्षसी प्रवृत्तीची संततीही आहे. आज या करता कठोर कायदे आहेत, त्याची मदत प्रसंगानुरूप प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी अवश्य घ्यायला हवी.
पण, ह्या थकल्या-भागल्या जीवांना मदत मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी हवेच, आणि ते काम फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनाच करु शकतात, या करिता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी , काळाची पावले ओळखून आपापल्या गांवी संघ स्थापन करण्यात पुढाकार घेतला पाहिजे, व तो जिल्ह्यातील “फेस्कॉम” च्या स्त्रोतांशी जोडला पाहिजे.
महाराष्ट्रात आज ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ४३६०० चे वर गावे आहेत. १२+(होणारे+ २ )प्रादेशिक विभाग कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार प्रत्येक गावी संघ उभा करण्यासाठी, सुसज्ज बांधीव जागेसह, मदत करते, याकरिता पुढाकार घेऊन प्रत्येक गावानें प्रयत्नशील व्हायला हवे.
फेस्कॉमच्या अथक प्रयत्नाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या S. T. बसमध्ये मोफत प्रवास, महिलांना अर्धे भाडे ही फेस्काॅम ची मागणी सरकारने पूर्ण केलीच आहे. ६५ वर्ष ऐवजी ६० वर्ष सवलतीची मागणी फेस्काॅम करीत आहे. रेल्वेने कोरोनामध्ये ज्येष्ठांना बंद केलेली अर्ध्या तिकीटाची सवलत परत मिळविण्यासाठी आईस्काॅन प्रयत्नशील आहे.
कोरोना महामारीच्या दोन अडीच वर्षे उद्रेकात ज्येष्ठ नागरिक चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे, आपण ४-५ वर्ष मागे गेलो आहे. आपले उदिष्ट गाठण्यासाठी आता प्रत्येक ज्येष्ठ बंधू भगिनींना सहकार्याने कामास लागायला हवे.
आपल्याला पदे वा पदाधिकारी नकोत, गरज आहे तळमळीच्या कार्यकर्त्यांची, आपले नाव हेच पद झाले पाहिजे असे झटून काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींची… तेव्हांच ज्येष्ठ नागरिक चळवळ फोपावेल.
१ ऑक्टोबरच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांची ‘गाव तेथे संघ’ ही गर्जना बुलंद करावी, एकजुटीच्या आवाजात, सरकार मध्ये प्रतिनिधित्व व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र खात्याची मागणी करावी. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे, या संपत्तीचे रक्षण करणे,हे सरकारचे कर्तव्य आहे, व गरज पडल्यास, कोणासही अनुभवाचे मार्गदर्शन देणे हे प्रत्येक ज्येष्ठांचे कर्तव्य आहे.
ज्येष्ठ शक्ती चा विजय असो…, नारी शक्तीचा विजय असो…
– सुरेश पवार, लासलगाव, 9423967520
(लेखक AISCCON, Tour Travel entertainment Committee. अर्थात अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ चेअर पर्सन आहेत.)