चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) अक्कलकुवा ते गोंदिया जाणाऱ्या बसमधील ४२ परप्रांतीय मजुरांना नगरसेवक जीवनभाऊ चौधरी यांच्यामार्फत जेवण देण्यात आले. यावेळी या सर्व मजुरांची क्षुधाशांती करीत जीवनभाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांची विचारपूस केली. आपले आरोग्य सांभाळून स्वतःला 15 दिवस पर्यंत घरी गेल्यावर विलगीकरण करून राहण्यास मार्गदर्शनही केले. तहसीलदार अनिल गावित यांनीदेखील दुरध्वनीने मजुरांची विचारपूस केली.
अहमदाबाद येथे काम करणारे व पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेले ४२ मजूर हे पायपीट करीत अक्कलकुवा येथे पोहचले. तेथील प्रशासनाने त्याची दखल घेत मोफत बस उपलब्ध करून दिली. त्यांना गोंदिया जाण्यासाठी सकाळी ११ वाजता बस मार्गस्थ झाल्या. सदर बस चोपडा बस स्थानकावर आल्यानंतर जीवनभाऊ चौधरी व आगार व्यवस्थापक क्षीरसागर, तहसील कार्यालयाचे लियाकत तडवी, संरक्षण अधिकारी प्रतीक पाटील, तालुका पेसा समन्वयक प्रदीप बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ बडगुजर, साई भोजनालयचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी जीवनभाऊ चौधरी यांनी जेवणाची व्यवस्था केली, तर सागर बडगुजर यांनी मिनरल पाणी बॉटलचे वाटप केले. सर्व मजुरांनी केलेल्या व्यवस्थेबद्दल प्रशासनाचे आभार मानले.
पश्चिम बंगालला जाणाऱ्या मजुरांची चोपडा बसस्थानकावर क्षुधाशांती
