चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यंदा इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी ठरले आहे. मागील कार्यकाळातही हे पद सामान्य महिला वर्गासाठी आरक्षित होते. आता पुन्हा महिला आरक्षण लागू झाल्यामुळे सत्तेची सूत्रे पुन्हा महिलांच्या हाती जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांमधून कोणती महिला उमेदवार मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेमध्ये एकूण ३० नगरसेवक आहेत, यंदा दोन सदस्यांची भर पडणार असून एकूण ३२ सदस्य निवडून येणार आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा चौधरी नगराध्यक्षा झाल्या होत्या.मात्र यावेळी दोन सदस्य वाढल्याने नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत होते आणि अध्यक्षपदही त्यांच्या खात्यात गेले होते. मात्र राज्य सरकारमध्ये झालेल्या बदलांनंतर आता समीकरणे बदलू शकतात. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे सेना गट कोणत्या बाजूला जाणार हे पाहण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल.
समीकरणात बदल
राजकीय समीकरणांचा विचार करता, यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
सर्व पक्षांकडून महिला उमेदवारांची घोषणा लवकरच होईल आणि नगराध्यक्षा पदासाठी महिलांमधील रोचक सामना पाहायला मिळेल. सध्या मात्र कोणत्याही पक्षाकडून विशेष मजबूत महिला चेहरा पुढे आलेला दिसत नाही.या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने आपले बहुमूल्य मतदान करते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
