• Wed. Feb 4th, 2026

चोपडा नगरपरिषदेकडून नागरिकांसाठी व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण सेवा सुरू

चोपडा (साथीदार वृत्तसेवा)
चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना स्वच्छता व विद्युत (दिवाबत्ती) आदी मूलभूत नागरी सुविधा अधिक तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती संदर्भात नागरिकांकडून नगरपरिषदेकडे विविध माध्यमांतून तक्रारी प्राप्त होत असतात. मात्र, योग्य अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने अनेकदा तक्रारींच्या निवारणास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले होते.


ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून स्वच्छता विभाग व विद्युत विभागासाठी स्वतंत्र तक्रार निवारण भ्रमणध्वनी उपलब्ध करून देत स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आता नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सॲप संदेशाद्वारे थेट तक्रार नोंदविता येणार आहे.


या अभिनव उपक्रमाचे दि. २७ जानेवारी २०२६ रोजी औपचारिक अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी सांगितले की, शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहरातील कचरा वेळेवर न उचलणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, कचरा साचणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांशी संबंधित अडचणी तसेच रस्त्यावरील दिवे बंद असणे, नादुरुस्त होणे किंवा अपुऱ्या प्रकाशामुळे होणाऱ्यासमस्यांबाबत थेट नगरपरिषदेकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवावी.


नागरिकांच्या सोयीसाठी खालील तक्रार क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी यांच्यामार्फत तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


*तक्रार निवारणासाठी उपलब्ध व्हॉट्सॲप क्रमांक :*
• स्वच्छता विभाग : 7821989533
• विद्युत (दिवाबत्ती) विभाग : 9529296921
तक्रार नोंदणी फक्त व्हॉट्सॲप संदेशाद्वारे स्वीकारली जाईल.
शहर स्वच्छ, सुरक्षित व प्रकाशमान ठेवण्यासाठी नागरिकांनी या सेवेचा योग्य व प्रभावी वापर करावा, असे आवाहन चोपडा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.