नंदुरबार – ( साथीदार वृत्तसेवा) नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी सर्व उर्वरित करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नव्हता. मात्र, मंगळवारी दि. १९ मे रोजी मुंबईहून आपल्या मुलीकडून आलेल्या तालुक्यातील रजाळे गावातील एका व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर प्रशासनाने रुग्णाच्या संपर्कात असलेल्या अठरा लोकांना क्वारंटाइन केले होते. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३० रुग्ण झाले असून, त्यापैकी ९ जण उपचार घेत आहेत, तर १९ जण करोनामुक्त झाले आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये २८ वर्षीय स्त्री, ३१ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय स्त्री, ६ वर्षाची मुलगी, ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच २ जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अनुक्रमे २७ आणि ३२ वर्षीय पुरुष आणि धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील ३५ वर्षाच्या पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
अचानक रुग्ण सापडल्याने प्रशासनाने नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. अनावश्यक बाहेर फिरू नये आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे. रजाळे येथील रुग्णांची संपर्क साखळी बारकाईने शोधण्याचे निर्देश डॉ. भारुड यांनी दिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३० रुग्ण झाले असून, त्यापैकी ९ जण उपचार घेत आहेत, तर १९ जण करोनामुक्त झाले आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.