• Sun. Feb 15th, 2026

महाशिवरात्रीनिमित्त अठरा फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले महाशिवलिंग

चोपडा (प्रतिनिधी) महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता, निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा हा स्मरणदिन असल्याची आध्यात्मिक मान्यता आहे.

अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे नेणारा हा पर्व मानवी जीवनात आत्मचिंतन, संयम, पवित्रता आणि सद्भावना जागृत करणारा आहे. उपवास, जप, तप, ध्यान आणि रुद्राभिषेक यांसारख्या धार्मिक कृतींबरोबरच आत्मशुद्धी व सद्गुणांचा स्वीकार करण्याचा संदेशही या दिवशी दिला जातो.

याच महत्त्वपूर्ण पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, चोपडा यांच्या वतीने एक आगळावेगळा आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथमच अठरा फूट उंच व 21,111 (एकवीस हजार एकशे अकरा) कच्च्या केळ्यांपासून साकारलेले भव्य महाशिवलिंग दर्शनासाठी सजविण्यात आले असून, हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरणपूरक आणि सर्जनशील पद्धतीने साकारलेले हे महाशिवलिंग भक्तांच्या श्रद्धेला नवचैतन्य देणारे ठरत आहे.    

या निमित्ताने प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड, चोपडा येथे 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता व रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमा दरम्यान आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून, त्यातून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा-परमात्म्याचे नाते, तसेच सदाचारयुक्त जीवनाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.    

आयोजकांनी नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व परमात्म्याचा दिव्य संदेश समजून घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चोपडा शहरात साकारलेला हा अनोखा उपक्रम भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.