• Fri. Feb 20th, 2026

अठरा फुट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारलेल्या महाशिवलिंगाचे उदघाटन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चोपडा यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या १८ फूट उंच भव्य महाशिवलिंगाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. २१,१११ कच्च्या केळ्यांपासून पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आलेले हे शिवलिंग भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.


महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व श्रद्धेचा उत्सव मानला जातो. निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा स्मरणदिन म्हणून या पर्वाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाते. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे नेणारा हा उत्सव आत्मचिंतन, संयम, पवित्रता व सद्भावना जागृत करणारा आहे.


या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. विकास हरताळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.अरुणभाई गुजराथी, नगराध्यक्षा नम्रता पाटील,डॉ. विनीत हरताळकर, डॉ सुरेश बोरोले, डॉ पवन पाटील, हेमलता बोरोले, ॲड. निर्मल देशमुख, राजूभाई शर्मा, चंदुलाल पालीवाल, तसेच ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी, सारिका दिदी, शितल दिदी, करिश्मा दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.


सदर शिवलिंग तयार करण्यासाठी   सेवाधारी राजू अण्णा पाटील, पंकज भाई, महेंद्र भोळे, डॉ. ईश्वर बोरसे, यशवंत चौधरी, कुणाल भाई, घनश्याम भाई, वसंत भाई, शिवाजी पाटील, जयेश पाटील, सौरभ भोळे तसेच कांचन भोळे, वंदना पाटील, उषा बोरसे, शुभांगी कापूरे, कल्पना पाटील, अनिता पाटील, नीलिमा पाटील, निर्मला पाटील, रजनी बाविस्कर, योगिता कोळी, मनिषा पाटील, सविता पाटील, संध्या पाटील, शैला शिंदे आदींचा सहभाग उल्लेखनीय होता.


हा उपक्रम प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड येथे १५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. दररोज सकाळी ७.३० वाजता व रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून, त्यातून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा–परमात्म्याचे नाते आणि सदाचारयुक्त जीवनाची दिशा स्पष्ट केली जात आहे.


सदर शिवलिंग चार दिवस दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व परमात्म्याचा दिव्य संदेश आत्मसात करावा, असे आवाहन ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दिदी यांनी केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.