नव्या सदस्यांसाठी आवाहन!
अमळनेर- (डॉ.अनिलकुमार पालीवाल) संसारातील छोटे-मोठे वाद, पती-पत्नीमधील विसंवाद आणि कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेली कुटुंबे वाचवण्यासाठी ‘महिला अन्याय विरोधी समिती’ने राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
आजवर शंभराहून अधिक विखुरलेले संसार पुन्हा उभे करणाऱ्या या समितीने आता आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, अमळनेरसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा व राज्यातील सेवाभावी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात शुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत पोहोचणारी प्रकरणे कौटुंबिक समुपदेशनाद्वारे (Counseling) सोडवली जाऊ शकतात. यामुळे दोन्ही परिवारांची होणारी आर्थिक आणि मानसिक ओढाताण थांबते. या सामाजिक कार्यात रस असणाऱ्या महिला, पुरुष आणि तरुण वर्गासाठी समितीची दारे उघडी आहेत.
या कार्यात सहभागी झाल्याने शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे कौशल्य आत्मसात होईल, सामाजिक जाणिवा विस्तारून मित्रपरिवारात वाढ होईल, विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडल्याचे आत्मिक समाधान मिळते, इच्छुक व्यक्ती आपल्या भागात समितीची शाखा देखील सुरू करू शकतात तरी सामाजिक कार्याची आवड असलेल्यां कोणत्याही वयोगटातील सज्ञान महिला-पुरूषांनी अधिक माहितीसाठी समितीचे अध्यक्ष धनंजय सोनार (अमळनेर) यांच्याशी ७९७२८ ८१४४० या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
