रसायनी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद
रायगड – (साथीदार वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची नवी दिल्ली येथे शुक्रवारी दि. २२ मे रोजी बैठक झाली. या महत्त्वाच्या बैठकीत, ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड (HOCL) या कंपनीच्या सरकारी कर्जावरील ७.५९ कोटी रुपयांचे, ३१ मार्च २००५ पर्यंत व्याज माफ करण्याच्या प्रस्तावाला एक्स पोस्ट फॅक्टो (ex post facto) मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे येथील अधिकारी व कर्मचारी वर्गात आनंद पसरल्याची माहिती आपत्ती व सुरक्षातज्ज्ञ जयपाल पाटील यांनी ‘साथीदार’शी बोलताना दिली.
‘सीसीईए’च्या मार्च २००६ मध्ये झालेल्या बैठकीत HOCL ला देण्यात आलेल्या पुनर्वसन पॅकेजमध्ये ३१ मार्च २००५ पर्यंतच्या दंडात्मक व्याज आणि व्याजावरील व्याजाला माफी देण्यात आली होती. त्या व्यतिरिक्तच्या व्याजाला आज झालेल्या बैठकीत माफी देण्यात आली आहे.
ही जवळपास दहा वर्षे जुनी घटना असल्यामुळे, व्याजाची ७.५९ कोटी रुपये रक्कम आधीच सरकारी कर्ज खात्यातून तसेच HOCL च्या व्यवहारातून सोडून देण्यात आली आहे. त्यावरील व्याजदेखील किरकोळ आहे. त्यामुळे आता या टप्प्यावर, हे व्याज माफ करून नियमित करुन घेणेच व्यवहार्य आणि श्रेयस्कर ठरणार आहे. या व्याजमाफीमुळे HOCL ला या बाबतीतल्या ‘कॅग’च्या निरीक्षणावर तोडगा काढून पुढे जाता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रसायनी येथे असलेली ही कंपनी अनेक दिवसापासून अडचणीत होती.