पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडे पाहताना मी, मदमस्त हत्तीवर अंकुश ठेवणा-या माहुताची उपमा पत्रकारास देतो. मी आजवर पत्रकारांवर व पत्रकारितेवर लिहिलेले लेख गाजले. या लेखांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी लाभली. प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. मी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेत आहे. त्यामुळे पत्रकारितेतील गुण व अवगुणांची मला माहिती आहे. त्यामुळे मी जे लिहितो ते वस्तुनिष्ठ असते. दरवर्षी ६ जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारांचे व पत्रकारितेचा गुणगौवर केला जातो. पत्रकारांनी देखील या दिवशी स्वतःच्या पत्रकारितेची समीक्षा करणे आवश्यक आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, असे आपण नेहमी म्हणतो. पण या आरश्याचा पारा उडाला तर तो विद्रूप दिसतोच आणि त्यातील प्रतिमा ही विद्रूप दिसतात. समाजाचे व राजकारणाचे खरे, वास्तव रूप दाखवणारा आरसाच खरा असतो. भाटगिरी करून आपल्या व आपल्या पोशिंद्याच्या सोयीचे रूप दाखवणारा आरसा हा पारा उडालेला आरसा असतो.
खिंचो ना कमान, ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल है, तो अखबार निकालो
अशी वृत्तपत्राची पूर्वी महती होती.आज ती टिकून आहे का ? ज्याला रामशास्त्री बाण्याचे म्हणावे , अशी किती दैनिकं आहेत? मराठा, केसरी, नवा
काळ, बहुजन नायक, या परंपरेतील किती वृत्तपत्रं आज आहेत. पूर्वी पत्रकारिता हे व्रत होते.आता तो व्यवसायच नव्हे तर धंदा झाला आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर तर विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या धनाढ्यांची मालकी आहे. आता पत्रकारितेचा उपयोग भांडवलदार धंदा म्हणून करीत आहेत.
वृत्तपत्राचं पहिलं पान हे फक्त आणि फक्त वाचकाचे असायला हवे परंतू या पानावर जाहिरातींचे अतिक्रमण झालेले दिसते. एखाद्या वृत्तपत्राचा मथळा, हेडिंग हे त्याचे वैशिष्ट्य असायचे.त्याची दिवसभर चर्चा चालत असे. परंतु, आता पहिले पान बिल्डर,विकासकांना, वा उद्योजकांना आंदण दिले जाते. जाहिरातींशिवाय वृत्तपत्र चालू शकत नाही, हे जरी मान्य असले तरी त्याचे स्थान पहिले पान असूच शकत नाही. मग असे वृत्तपत्र एखाद्या स्मरणिकेसारखे निव्वळ उपन्न मिळविण्याचे साधन ठरते. त्याला वृत्तपत्र म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आज छपाईचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलले आहे. पुर्वी 6 वाजताची जी डेडलाईन होती ती रात्री 11 पर्यंत गेली. छायाचित्रासाठी, रंगीत छपाईसाठी किती सायास पडायचे ते त्यावेळच्या पत्रकारांनाच ठाऊक. बातमी पाठवणे देखील किती अवघड काम होते, ते ज्येष्ठ पत्रकार जाणवतात. त्यामुळे जे कष्टसाध्य असते त्यालाच महत्व असते,तसे त्यावेळी पत्रकार व पत्रकारितेस असायचे ?
आज बातमी ही मॅगीसारखी झटपट तयार होते.एका क्लिक वर बातमी वृत्तपत्रात पोहचते. काॅपीपेस्ट म्हणजे झेराॅक्स बातम्या अनेक वृत्तपत्रात येतात. छायाचित्रांचा तर पाऊस पाडता येतो. पुर्वीच्या पेजमेकिंगसाठी फिलर लागायचे. आता ते काम छायाचित्रं करतात. छायाचित्र लहान मोठे केले,फाऊंट साईज वाढवली किंवा स्पेस वाढवले की झाले पेज तयार. वरून पिझ्झा बर्गरची टेस्ट आणल्याचे समाधान.
एकंदरीत पत्रकारितेचा धंदा झाला आहे. पत्रकार हा बहुदा हायर केलेला असतो. बातमी पाठव,पण मानधन मागू नको. जाहिराती आणशील त्यात जे कमिशन मिळेल तिच तुझी कमाई, असे धोरण अनेक वृत्तपत्रांचे आहे. त्यामुळे गैरप्रकारांना मोकळे रान करून दिले जाते. काही अपवाद सोडले तर बहुतांश वृत्तपत्रं तुटपुंजे मानधन पत्रकारांना देतात.पूर्ण वेळ पत्रकार सोडले तर जिल्हा,तालुका व शहर पातळीवरील पत्रकारांचे मानधन (?) वेठबिगारालाही लाजविणारे असते. अशा वेळी त्याने प्रामाणिकपणे पत्रकारीता करण्याची अपेक्षा ते दैनिक करू शकत नाही. सर्वसामान्य जनता व वाचकांत पत्रकारांविषयी असलेली क्रेझ व आदरभाव नष्ट होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारेच त्यास मारक ठरतात. पूर्ण वेळ व पे रोलवरील प्रकारांव्यतिरिक्त जे पत्रकार आहेत, त्यांना स्ट्रिंजर असे संबोधले जाते. माझ्या मते त्यांनी आत्मनिर्भर व्हावे व स्वतःच्या उपजिविकेसाठी नोकरी,व्यवसाय करूनच पत्रकारीता करावी, तरच त्यांना सन्मान प्राप्त होईल. आज पाकिट पत्रकारीता फोफावली आहे, पेड न्यूज ही वहिवाट झाली आहे. अशा परिस्थितीत पत्रकाराला आपल्या आत्मसन्मानासाठी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रवाहपतीत होण्याऐवजी प्रवाहाविरूध्द पोहण्याची गरज आहे. पत्रकारांबद्धल आदरयुक्त भीती असली पाहिजे, भ्रष्ट ठेकेदार, राजकारणी यांच्यावर दहशत असली पाहिजे. पत्रकारीता ही समाज हित,समाजात परिवर्तन व प्रबोधन करणारी असली पाहिजे. पत्रकाराला प्राईज टॅग लागायला नको.पत्रकाराची किंमत पाकिटातील रकमेवर ठरायला नको. पत्रकार हा आपला गुलाम आहे, वेठबिगार आहे, पे रोलवरील पोस्टमन आहे,अशी भावना निर्माण होणे हे पत्रकारांचे अवमूल्यन व पत्रकारितेची हत्या ठरेल. पैसे कमावण्याची अनेक साधनं आहेत, त्यात याहूनही कित्येक पटीने अधिक पैसे मिळतील. म्हणून पत्रकारांना कळकळीची विनंती, पत्रकारीता कलंकित करू नका,आपल्या पत्रकारितेचा दरारा निर्माण करा, पत्रकार हा सर्वसामान्यांना आधार स्तंभ वाटला पाहिजे व दुष्ट, भ्रष्टांना व अपप्रवृत्तींना कर्दनकाळ वाटला पाहिजे.
लेखक – दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०