चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे महाराष्ट्र पालिवाल परिषदेच्या नेतृत्वाखाली पालिवाल पंचायत चोपडाच्या सहकार्याने रविवारी दि २४ मे रोजी पालिवाल समाजबांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
या वेळी समस्त पालिवाल समाजबांधवांना या गोळीबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली. गोळ्या घेण्याच्या वेळा, त्यासाठी पाळावी लागणारी पथ्ये आणि इतर शंकांचेही यावेळी ‘आरोग्यम’ ई एच हेल्थकेअरचे डॉ. विशाल राजेंद्र पालिवाल यांनी निरसन केले. चोपड्यातील हा स्तुत्य उपक्रम जळगाव जिल्ह्यातील पालिवाल समाजात सर्वच कुटुंबियांना गोळ्याचे वाटप करून राबवण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या वतीने अध्यक्ष कांतीलाल पालिवाल, महामंत्री अनिलकुमार पालिवाल, चोपडा अध्यक्ष प्रदीप पालिवाल यांनी दिली आहे.
याप्रसंगी माजी अध्यक्ष राजेंद्र भालचंद्र पालिवाल, प्रवीण पालिवाल आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील लासूर, चौगाव, गोरगावले, लोहारा, नेरी, नांद्रा, रोटवद, जळगाव, देवपिंप्री, पाचोरा, वरखेडी येथेही या औषधीचे वाटप ‘आरोग्यम’तर्फे केले जाणार असल्याचे डॉ. विशाल पालिवाल यांनी या वेळी सांगितले.
कोरोना संकटकाळात अविरत रुग्णसेवा करणाऱ्या ‘करोनायोद्धा’ ठरलेल्या डॉ. विशाल पालिवाल यांच्या या उपक्रमाचे समाजबांधवांनी कौतुक केले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुढील काळात हर्बल इलेक्ट्रो होमिओपथीच्या माध्यमातून उपचारपद्धती सुरू करणार असल्याचेही डॉ. पालिवाल म्हणाले. अशाप्रकारे हा उपक्रम पुढील काळात पुणे, नाशिकमध्येही राबविण्याचा मानस डॉ. विशाल पालिवाल यांनी बोलून दाखवला.