नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास ८० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मनरेगाअंतर्गत शेल्फवर ९८ हजार ८५१ कामे ठेवण्यात आली असून, १ लाखापेखा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण ५,०७७ पैकी २,६०३ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात १०,३१०, धुळे ११,०८०, जळगाव ५,४४१, नाशिक २०,३३४ आणि नंदुरबार जिल्ह्यात ३५,००० मजूर कामावर आहेतसोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत.
स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त राजाराम माने, उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधीक कामे हाती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
मजुरांना एका दिवसासाठी २३८ रुपये मजुरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजुरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल,मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे. विशेषत: अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे.
आता सुरू झालेल्या कामांमध्ये वैयक्तिक स्वरुपाची ११९७४ कामे सुरू असून, ४९ हजारावर मजूर कामावर आहेत. तर सार्वजनिक स्वरुपाची ११७७ कामे सुरू असून तेथे सुमारे २७ हजार मजूर कामावर आहेत. कोविड संकटाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले असताना ग्रामीण भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत असून योजनेचा अधिकाधीक नागरीकांना लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चिखले यांनी केले आहे.