नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी शनिवारी दि. २३ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत दिले.
बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, कृषी उपसंचालक एम. एस. रामोळे उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, मनरेगातून जिल्ह्यात ५ हजार १४४ कामे सुरू असून, ४१ हजार १५७ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातून ७५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. सध्या शेतीमजुरीची कामे ठप्प कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास ५ हजार याप्रमाणे ३० हजार मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावीत. एका कृषि सहायकाणे पाच कामे, कृषि पर्यवेक्षक दहा सनी कृषि अधिकाऱ्याने किमान पंधरा कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची शंभर टक्के कामे केल्यास फळबागाच्या कामातून ३० ते ३५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करणयात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी. मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत. काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी – बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.