मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाइन करिअर पोर्टल सुरू केले आहे. राज्यात कोविड -१९ चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी घरी असल्याने हे ऑनलाइन करिअर पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन करिअर पोर्टल विद्यार्थ्यांना करिअरच्या मार्गांविषयी आणि शिक्षण, प्रवेश परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आधारावर अधिक माहिती देणार आहे.
शुक्रवारी एका वेबिनारद्वारे शिक्षणमंत्र्यांनी हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. Mahacareerportal.com या संकेतस्थळावर विद्यार्थी ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश करू शकतात. ऑनलाइन पोर्टल आयड्रीम करिअरसह युनिसेफने विकसित केले असून, हे ऑनलाइन करिअर पोर्टल शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर वापरता येईल.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ऑनलाइन पोर्टल विद्यार्थ्यांना करिअरचे विविध पर्याय शोधण्यास सक्षम करेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल निवड करण्याच्या हेतूने हे राज्य सल्लागारांचे पोर्टल नक्की वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने हे पोर्टल मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे.
- ऑनलाइन करिअर पोर्टलमध्ये पाचशेहून अधिक करियर पर्याय उपलब्ध आहेत. जे नियमितपणे अपडेट केले जातील.
- यात कृषी आणि अन्न विज्ञान, आतिथ्य आणि पर्यटन, विषाणूशास्त्र, अॅनिमेशन आणि ग्राफिक्स आणि क्रीडा आणि फिटनेस यासह पारंपरिक करिअर क्षेत्रांचा समावेश आहे.
- पोर्टल विद्यार्थ्यांना करियरचे डोमेन शोधण्याची आणि विविध देशांमधील पात्रता, शैक्षणिक आवश्यकता, महाविद्यालये समजून घेण्यास मदत करेल.
- पोर्टल आवश्यक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि फील्डमध्ये वेगवेगळे एंट्री पॉईंट्स आणि विशिष्ट करिअर क्षेत्रातील वेगवेगळी माहिती पर्यायांसह उपलब्ध करेल.