जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात ज्या नागरिकांनाकडे रेशनकार्ड नसेल अशांना आज, दि. १ जूनपासून धान्य वाटप होणार आहे.
जिल्ह्यात कार्ड नसलेले २ लाख १६ हजार २९७ लाभार्थी आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
करोनामुळे अनेक मजुरांना रोजगार मिळत नाही. परिणामी, त्यांची उपासमार होत आहे. अनेकांकडे रेशनकार्ड नाही. अशांना विना कार्ड तांदूळ व चणा देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्याबाबत कार्ड नसलेल्या नागरिकांची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात तयार करण्यात आली असून, त्यानुसार कार्ड नसलेल्या नागरिकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ व प्रतिकुटुंब १ किलो चणा दिला जाणार आहे. रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनी जवळच्या रेशन दुकानदाराकडे तांदूळ व चणा यांची मागणी करायची आहे, असेही पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.