• Sat. Jul 5th, 2025

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन

नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हरित सातपुडा अभियान’ राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, तसेच ही जनचळवळ व्हावी यासाठी शिक्षकांची विशेष योगदान द्यावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरित सातपुडा अभियाना’च्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अविश्यांत पांडा, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, संदीप कदम, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, गावपरिसरातील मोकळ्या जागेत मृदसंधारणाची कामे घेण्यात यावीत आणि पावसाळ्यात याठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करताना स्थानिक पर्यावरणानुसार रोपांची निवड करावी. कृषी आणि वन विभागाने ‘गाव तेथे नर्सरी’ उपक्रम राबवावा. नर्सरीसाठी नाविन्यपूर्ण योजना किंवा सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती प्रात्यक्षिकांसह द्यावी.

प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. माथा ते पायथा जलसंधारणाचे काम करून वृक्षारोपण करावे. जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांनी जनजागृतीचे काम करावे. वृक्ष संवर्धनाची नवी संस्कृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे आहे. असे केल्यास गावातून होणारे स्थलांतर कमी होऊन जंगलातील उत्पादनाचा आर्थिक लाभ स्थानिकांना होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा या भागातील वृक्षारोपण अभियानाचे संनियंत्रण तीन अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्यात येऊन गावपातळीपर्यंत प्रत्येक घटकाची आणि यंत्रणेची अभियानातील भूमीका निश्चित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. वृक्षतोडीपासून होणारे नुकसान जनतेला समजावून सांगावे, १४ वा वित्त आयोग आणि पेसातील निधीच्या २५ ते ४० टक्के हिस्सा मृद, जल आणि वन संवर्धनासाठी उपयोगात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमती धोडमिसे यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची माहिती दिली. मनरेगा, सीएसआर, नगरपालिका आदी माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. आंबा, महूआ, साग, बांबू, आवळा, सीताफळ आदी उपयुक्त झाडे लावण्यावर भर देण्यात येणार आहे. वन विभागाकडील जागा, समतल चराजवळील जागा, ग्रामपंचायत क्षेत्रातील मोकळी जागा, रस्त्याच्या दुतर्फा आदी विविध ठिकाणी झाडे लावण्यात येतील. अभियानासाठी तीन वर्षाचे नियोजन करण्यात येईल. रोजगार निर्मिती आणि वनीकरण असा समन्वय या अभियानाच्या माध्यमातून साधला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आश्रमशाळेच्या शिक्षकांमध्ये अभियानात मोठे योगदान देण्याची क्षमता असून परिसरातील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मुख्याध्यापकांनी नियेाजन करावे, असे आवाहन पांडा यांनी केले.
बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.