• Sat. Jul 5th, 2025

आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

वारकऱ्यांनी सहकार्य करण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. वारकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच कोरोनाचे संकट ध्यानात घेऊन पंढरपूर येथे न जाता आपापल्या घरीच विठ्ठलाची पूजा करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायातील प्रमुखांसोबत पंढरपूरची आषाढीची वारी चालू ठेवण्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ व नामदेव अशा सात संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढीसाठी जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा यंदा करोनामुळे खंडित होऊ नये. परंतु त्याच वेळी या साथीच्या रोगाला कोणी बळी पडू नये, असा विचार झाला. त्यातून तीन पर्याय सुचविण्यात आले. निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत नेहेमीप्रमाणे पालख्या नेण्यात याव्यात किंवा वाहनाने पालख्या नेण्यात याव्यात किंवा हेलिकॉप्टरने पादुका नेण्यात याव्यात असे तीन पर्याय मांडण्यात आले. प्रशासनाने आज वाहन किंवा हेलिकॉप्टर हे दोन पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारीची परंपरा खंडीत होणे टाळले जाईल व त्याचबरोबर कोरोनापासूनही बचाव केला जाईल. भाजपा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करते.

ते म्हणाले की, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेबद्दल समाजात मोठी आस्था आहे. वारीची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा करोनाचे संकट असल्याने प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आपण सर्व वारकऱ्यांना करतो. आषाढीसाठी पंढरपूरला दरवर्षी लाखो लोकांनी जाण्याची परंपरा यंदा बाजूला ठेऊन आपण सर्वांनी घरीच विठ्ठलाची पूजा करून आषाढी एकादशी साजरी करणे गरजेचे आहे.

त्यांनी सांगितले की, पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्र आणि भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेल आणि आगामी काळात परंपरेप्रमाणे दिमाखात पंढरपूरची वारी होईल अशी आपल्याला खात्री आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.