वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे चोपडा व्यापारी महामंडळाचा एकमुखी निर्णय
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा शहरात दररोज करोना रुग्णांचा आकडा वाढत असताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने एकमुखी स्वयंस्फूर्तीने पाच दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चोपड्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी सांगितले. हा बंद सर्वात वेगळा आणि कडक शिस्तीचा असणार आहे. यात दूध, मेडिकल व कृषी केंद्र, पावसाळी प्लास्टिक दुकाने वगळता काहीच सुरू असणार नाही.
कारवाई करण्यात येणार
जे दुकाने बंद काळात सुरू असतील त्या दुकानांवर चोपडा नगरपालिकेकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये नगरपालिका दहा हजाराचा दंड घेतला जाणार असून, ती दुकाने सील करण्यात येतील असा एकमुखी निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला आहे.
भाजीपाला, फळे, हातगाडीवर मिळणाऱ्या वस्तू मिळणार नसून, या व्यावसायिकांनीदेखील बंदमध्ये सहभागी व्हायचे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. या बैठकीस सर्व व्यापारी, शहरातील प्रमुख संस्थेचे पदाधिकारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.
बाजारात येताना दुचाकी दुसरीकडे पार्क करा!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी शहर किंवा ग्रामीण भागातून मोटरसायकली या बस स्टँडमध्ये पार्किंग कराव्यात,
लॉकडाऊन उघडल्यानंतर देखील गावातील बाजारात जाताना आपल्या मोटारसायकली दुकानासमोर न लावताना त्या कायमस्वरूपी बस स्टॅण्ड, ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राउंड, मच्छी मार्केट पुलावर, गांधी चौक अशा मोकळ्या ठिकाणीच गाड्या लावून बाजारात यायचे आहे, असेही सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक कामे सोडून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर, मोटारसायकलीवर पोलिस आणि नगरपालिका प्रशासन कडक कारवाई करणार आहेत.
दूध विक्री केंद्र :
सकाळी सहा ते आठ तसेच सायंकाळी सहा ते आठ
मेडिकल दुकाने :
सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी पाच ते आठ
कृषी केंद्र व पावसाळी प्लास्टिक दुकाने :
सकाळी आठ ते बारा या वेळेतच सेवा देतील
चोपडावासीयांना नम्र आवाहन हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करत असताना जनतेने याचे काटेकोरपणे पालन करावे, असे नम्र आवाहन नगराध्यक्षा मनीषाताई जीवन चौधरी, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव, नगरपालिका गटनेता जीवनभाऊ चौधरी यांनी केले आहे.